esakal | टेंभुर्णी येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता ! इमारत बांधकाम व पदनिर्मिती संदर्भात शासनाचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

hospital

टेंभुर्णी शहर व परिसरातील रुग्णांची सोय व्हावी यासाठी टेंभुर्णी (ता. माढा) येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर केला होता. त्यास राज्य शासनाने "विशेष बाब' म्हणून मान्यता दिली असून, इमारत बांधकाम व पदनिर्मिती संदर्भातील शासन आदेश जारी केला असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

टेंभुर्णी येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता ! इमारत बांधकाम व पदनिर्मिती संदर्भात शासनाचे आदेश

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी शहर व परिसरातील रुग्णांची सोय व्हावी यासाठी टेंभुर्णी (ता. माढा) येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर केला होता. त्यास राज्य शासनाने "विशेष बाब' म्हणून मान्यता दिली असून, इमारत बांधकाम व पदनिर्मिती संदर्भातील शासन आदेश जारी केला असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

माढा मतदारसंघातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार बबनराव शिंदे हे मागील आठवड्यामध्ये मुंबई येथे दोन दिवस थांबून राहिले होते. या वेळी त्यांनी टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय मंजुरी, सीना - माढा योजनेसाठी निधीची तरतूद, मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी मिळणे, माढा येथील कोर्ट मंजुरी, नगर पंचायतीसाठी निधी मंजूर करणे यासह अनेक कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन विविध प्रकल्पांना मंजुरी व विकासकामांना निधी मिळण्यासाठी मागणी केली होती. 

टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाबाबत बोलताना आमदार शिंदे म्हणाले, टेंभुर्णी हे गाव सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शहर असून, मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई- हैदराबाद, दिल्ली- बंगळूर, सातारा- लातूर आदी महामार्ग टेंभुर्णी येथून जात असल्याने या ठिकाणी रस्त्यांचे केंद्रीकरण झालेले आहे. त्यामुळे येथून तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर, शिर्डी, नाशिक, कोल्हापूर, नरसिंहपूर आदी तीर्थक्षेत्रांना येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. उजनी धरण, एमआयडीसी, साखर कारखाने व बागायत क्षेत्रामुळे टेंभुर्णी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. टेंभुर्णी परिसरातील चाळीसहून अधिक गावांतील लोकांची ये- जा येथे आहे. त्यामुळे टेंभुर्णी परिसरातील अपघातांचे प्रमाण अधिक आहे. 

या ठिकाणी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर, अकलूज, पुणे येथे हलवावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. येथे आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुण्ग व त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे टेंभुर्णी येथे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना लेखी निवेदन देऊन टेंभुर्णीतील उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी देण्याबाबत मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मंजुरी देण्याविषयी सकारात्मकता दाखविली होती. मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे मंजुरी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरी देखील सातत्याने पाठपुरावा करीत होतो. आज 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली असून, रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करून तेथे बांधकाम व पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे शासनाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी 3 फेब्रुवारी 2021 रोजी माढा मतदारसंघातील प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावास मंजुरी देणे, तसेच निधी मागणीचे प्रस्ताव हे अर्थसंकल्पामध्ये सामाविष्ट होण्यासाठी तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या होत्या. त्यानुसार टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयास देखील शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विशेष लक्ष देऊन टेंभुर्णीला उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी दिली याबद्दल आभारी आहे. टेंभुर्णी येथे सर्व सोयी- सुविधांयुक्त सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात येणार असून, येथे टेंभुर्णी शहर व परिसरातील गोरगरीब लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळेल. 
- आमदार बबनराव शिंदे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image