esakal | कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर गुटखा तस्कऱ्यांची रात्रीस खेळ चाले ! माळशिरस तालुक्‍यात खुलेआम विक्री

बोलून बातमी शोधा

गुटखा
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर गुटखा तस्कऱ्यांची रात्रीस खेळ चाले ! माळशिरस तालुक्‍यात खुलेआम विक्री
sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : लॉकडाउन काळात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी असतानाही माळशिरस तालुक्‍यात मावा, गुटखा व तंबाखूची विक्री चढ्या दराने व खुलेआमपणे तेजीत सुरू आहे. कर्नाटकातून विविध कंपन्यांचा गुटखा तालुक्‍यात आणला जात आहे. लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवत अनेकांनी त्याचा फायदा उठवून तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचा गोरखधंदा मांडला आहे. यामुळे कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले पण कोरोनाबधित असलेले व तंबाखूजन्य पदार्थ खाणारे कोरोनाचे "सुपर स्प्रेडर' ठरण्याची चिन्हे आहेत. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. पोलिस यंत्रणा या पदार्थांची विक्री कशी रोखणार, हा खरा प्रश्न आहे. पोलिस प्रशासनाने अत्यंत कडक कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी सुजाण नागरिकांची मागणी आहे.

राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. या काळात किराणा दुकाने, दूध, बेकरी उत्पादने, भाजीपाला यांसारख्याच पदार्थांची विक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत करण्याचे बंधन घातले आहे. कडक लॉकडाउनच्या माध्यमातून सरकार कोरोनाची साखळी तोडण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहे. परंतु, तंबाखूजन्य पदार्थ चघळणारे त्यास छेद देऊन हरताळ फासत आहेत. लॉकडाउन असला तरी गावागावातील प्रमुख चौकात, दुकाने व गाळ्यांसमोर तरुण गुटखा, मावा खाऊन पिचकाऱ्या मारत गप्पा कुटताना दिसत आहेत.

हेही वाचा: आठ वर्षांपासून फरार अट्टल चोरटा अटकेत ! साडेआठ लाखांचे दागिने हस्तगत; पुण्यासह अनेक गावांत गुन्हे

पानपट्टीधारक भल्या पहाटे पानपट्टी उघडून मावा तयार करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दिवसभर इथे-तिथे थांबून त्याची विक्री करत आहेत. या पदार्थांच्या विक्रीसाठी विक्रेते नामी शक्कल लढवत आहेत. काहीजण पानपट्टीचे शटर खाली करून ठेवतात. ग्राहकांनी त्याखालून पैसे आत सरकविले की आतून माव्याची पुडी बाहेर येते. काही विक्रेते पानपट्टीच्या आसपास घुटमळून विक्री करतात. काही विक्रेते दिवसभराचा मावा बनवून पुड्यात भरून मोक्‍याच्या ठिकाणी थांबून विकत आहेत. माव्याच्या विक्रीसाठी ठोक विक्रेत्यांनी एजंट नेमले आहेत. 10 रुपयाची पुडी एजंट 8 रुपयांना खरेदी करून ग्राहकांना 15 रुपयांना विकत आहेत. लॉकडाउनच्या काळात किराणा दुकानातही आता मावा मिळू लागला आहे.

असे ठरतात माव्याचे दर

हलक्‍या व ओरिजनल पत्तीवर माव्याचे दर अवलंबून आहेत. हलक्‍या पत्तीचा मावा 10 ते 15 व ओरिजनल पत्तीचा 25 ते 30 रुपयांना विकला जात आहे. तालुक्‍याच्या प्रमुख गावात माव्यासाठी लागणारी सुपारी कातरण्याच्या मशिन्स आहेत.

हेही वाचा: सोलापूरला "बाप'च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध ! हेवेदावे विसरून आतातरी सर्वपक्षीय नेते एकत्र येतील का?

गुटख्याची तर तऱ्हाच निराळी आहे. महाराष्ट्रात तर त्याच्या विक्रीवर कायद्याने बंदी आहे. विमल, गोवा, माणिकचंद यांसारखा गुटखा कर्नाटकातून आणला जात असल्याचे सांगण्यात आले. ठोक विक्रेते चारचाकी गाडी भाड्याने करून सीमेपर्यंत जाऊन गुटखा आणत असल्याचे समजते. त्याची रात्रीची वाहतूक होत आहे. मात्र, यावर पोलिसांचे कुठेच नियंत्रण असल्याचे दिसत नाही. उलट त्यांचे त्यास "अभय' असल्याचे बोलले जाते.

तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती (रुपयात) : जुनी किंमत व कंसात सध्याची किंमत

 • मावा : 10 (15)

 • विमल : 10 (15)

 • माणिकचंद : 20 (25)

 • गोवा : 5 (10)

 • तंबाखू पुडी (10) (15 ते 20)

हे करायला हवे

 • माव्यासाठीच्या कच्च्या मालाच्या विक्रीवर बंदी

 • तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर छापे

 • पानपट्टी उघडणाऱ्यांवर कडक कारवाई

 • पानपट्टीबाहेर विक्रेत्यांना थांबण्यास मज्जाव

 • सिगारेट विक्रीवर बंदी

 • ग्रामीण भागातील किराणा दुकानांची झाडाझडती

 • परराज्यातून येणाऱ्या गुटख्यावर कठोर निर्बंध