esakal | दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली! मलिकपेठेतील नव्या पुलावरून वीस वर्षानंतर वाहतूक सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली!

सध्या सुरू असलेल्या सर्वदूर दमदार पावसाने मोहोळ तालुक्‍याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या सीना-भोगावती नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली !

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर) : सध्या सुरू असलेल्या सर्वदूर दमदार पावसाने (Heavy Rains) मोहोळ तालुक्‍याच्या (Mohol Taluka) उत्तर भागातून वाहणाऱ्या सीना (Seena River) - भोगावती नद्या (Bhogawati River) दुथडी भरून वाहू लागल्या आहेत (Flood). यामुळे सीना नदीवरील मोहोळ तालुक्‍यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून मलिकपेठ येथील सीना नदीवरील पुलाचे काम अर्धवट होते. ते या वर्षी पूर्ण झाल्याने येथील नव्या पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात बंधारा पाण्याखाली गेल्यानंतरही येथील बंधाऱ्यावरून होणारा प्रवाशांचा धोकादायक प्रवास थांबला आहे. सीना नदीवरील मालिकपेठ, नरखेड, अनगर रस्त्यावरील बंधारा तसेच बोपले व आष्टे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे.

हेही वाचा: बोरगाव-घोळसगावच्या वाहत्या ओढ्याच्या पुलावरून जीवघेणा प्रवास!

सीना, भोगावती व नागझरी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी आणि रविवारी रात्री झालेल्या जोरदार व संततधार पावसामुळे या नद्यांना चालू पावसाळ्यातील पहिलाच पूर आल्याने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सीना नदीवर मोहोळ तालुक्‍यातील बोपले, नरखेड-अनगर रस्त्यावरीत, मलिकपेठ, आष्टे हे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बोपले येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने बोपले - अनगर, नरखेड - अनगर बंधारा पाण्याखाली गेल्याने नरखेड - अनगर तर आष्टे येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने भांबेवाडी, हिंगणी या ठिकाणावरून मोहोळला होणारी वाहतूक बंद झाली आहे. भोगावती नदीलाही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठावर बसविलेल्या विद्युत मोटारी पाण्यात बुडून भिजल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पंप पाइपसह वाहून गेले आहेत. नदीकाठच्या शेतातील ऊस, मका, उडीद, सोयाबीन, तूर यासह फळबागा पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांत गेल्या वर्षीसारखी महाप्रलयकारी पूर परिस्थिती निर्माण होते की काय? अशी चिंता लागली आहे.

हेही वाचा: कुरनूर धरणातून 1800 क्‍युसेकचा विसर्ग ! गावांना सतर्कतेचा इशारा

गैरसोय झाली दूर

सीना नदीला पूर आला की मलिकपेठ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कायम पाण्याखाली जायचा. त्यामुळे प्रवाशांना मोहोळ, वैराग, सोलापूर येथे होणारी वाहतूक पर्यायी मार्ग नसल्याने बंद होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र ही गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी मागील वीस वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाच्या पाठपुराव्यामुळे या नवीन पुलावरून वाहतूक सुरळीत चालू झाली आहे. त्यामुळे सध्या मलिकपेठ बंधाऱ्यावर कितीही पाणी आले तरी मोहोळ - वैराग, मोहोळ - बार्शी, मोहोळ - वडाळामार्गे सोलापूर वाहतूक बंद होण्यास अडथळा राहिलेला नाही.

loading image
go to top