Accident News : साडूच्या घरातील कार्यक्रम उरकून परतत असताना अपघात; पती-पत्नी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband and wife killed in accident while returning home from family event mahud

Accident News : साडूच्या घरातील कार्यक्रम उरकून परतत असताना अपघात; पती-पत्नी ठार

महूद :  साडूच्या घरील सुवासिनींचा धार्मिक कार्यक्रम उरकून सोनके(ता.पंढरपूर) येथील आपल्या घरी परतत असताना महीम ते महूद रस्त्यावर पती-पत्नी प्रवास करत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने सोनके येथील पती-पत्नी जागेवरच ठार झाले आहेत.

पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील ज्ञानेश्वर तुकाराम मडके(वय ४५) व त्यांची पत्नी ताईबाई ज्ञानेश्वर मडके (वय ४०) हे दोघेजण महीम(ता. सांगोला)येथील त्यांचे साडू बाळासाहेब आवडाप्पा झुरळे यांच्या घरी ज्येष्ठ महिन्यातील सुवासिनींच्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.

हा कार्यक्रम संपवून ज्ञानेश्वर मडके व त्यांची पत्नी ताईबाई मडके हे दोघेजण दुचाकी वाहनावरून महूद मार्गे सोनके या आपल्या गावी निघाले होते.महीम ते महूद रस्त्यावरील हनुमान मंदिरापासून जवळ असलेल्या या रस्त्यावर मडके यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने रात्री आठच्या सुमारास जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे दुचाकी वरील ज्ञानेश्वर मडके व ताईबाई मडके या दोघांनाही जोराचा मार लागल्याने दोघेही जागेवरच ठार झाले आहेत.रात्रीच्या अंधारात धडक देऊन हे अज्ञात वाहन तिथून निघून गेले आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सांगोला पोलिसात झालेली नाही.

सोनके परिसरावर शोककळा

अपघातामधील मयत ज्ञानेश्वर मडके व ताईबाई मडके यांना एक मुलगी तर दोन मुले आहेत.यापैकी मुलीचे लग्न झाले असून मुलांपैकी एक जण अकरावी मध्ये आहे तर एक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

आई-वडील अपघातामध्ये ठार झाल्याने या कुटुंबाचा आधार निखळला आहे.कठीण परिस्थितीमध्येही मुलांच्या शिक्षणासाठी राबणारे आईबाप हरवल्याने सोनके परिसरावर शोक कळा पसरली आहे.

ठोकर दिलेल्या वाहनाचा शोध लावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही  सोनके येथील पती-पत्नी प्रवास करत असलेल्या दुचाकी ला जोरदार धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा ताबडतोब शोध लावावा, अशी मागणी करत सोनके येथील मोठा समुदाय अपघात ठिकाणी जमला आहे.

जोपर्यंत अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध लावला जात नाही,तोपर्यंत ज्ञानेश्वर मडके व त्यांची पत्नी ताईबाई मडके यांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका सोनके येथील नागरिकांनी घेतली आहे.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत येथे जमाव ठिय्या मारून बसला होता.तर पोलीस संबंधित वाहनाचा शोध घेत होते.

टॅग्स :accidentwife and husband