अप्पर पोलिस महासंचालकांनी पाठविले पत्र ! गर्दीकडे काणाडोळा करीत रस्त्यांवरच "वाहतूक'ची कमाई  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Jaam

शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, अपघातांची संख्या कमी व्हावी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही, यादृष्टीने वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने ठोस नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत दक्षिण आणि उत्तर वाहतूक पोलिस शाखेकडून दंड वसुलीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. वाहनचालकांकडे सर्व कागदपत्रे असल्यानंतर हेल्मेट नसल्याचे कारण देत त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. 

अप्पर पोलिस महासंचालकांनी पाठविले पत्र ! गर्दीकडे काणाडोळा करीत रस्त्यांवरच "वाहतूक'ची कमाई 

सोलापूर : शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, अपघातांची संख्या कमी व्हावी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही, यादृष्टीने वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने ठोस नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत दक्षिण आणि उत्तर वाहतूक पोलिस शाखेकडून दंड वसुलीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. वाहनचालकांकडे सर्व कागदपत्रे असल्यानंतर हेल्मेट नसल्याचे कारण देत त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. 

उत्तर वाहतूक पोलिस शाखेकडे 68 तर दक्षिण वाहतूक शाखेकडे 87 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीला होमगार्ड आहेत. "दरवाजा उघडा अन्‌ मोरीला बोळा' अशा प्रकारची स्थिती वाहतूक पोलिसांची दिसत असल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये आहे. मोठमोठ्या बाजारपेठांमध्ये अस्ताव्यस्त वाहनांची पार्किंग, स्मार्ट सिटीअंतर्गत खोदलेल्या रस्त्यांमुळे बिघडलेली वाहतूक शिस्त, दुकानांसमोर ग्राहकांसह वाहनांची वाढलेली गर्दी असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती आहे. 

पोलिस आयुक्‍तांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असून बेशिस्तांवर कारवाई करावी, अशा सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत. मात्र, त्याचा सोयीने अर्थ घेत वाहतूक पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता रस्त्यांवरील वाहने उचलून नेणे, रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांवरच कारवाई केली जात आहे. दुसरीकडे, महापालिकेने पार्किंग समस्येबाबत वाहतूक पोलिसांकडे बोट दाखविले आहे. 

वाहतूक अप्पर पोलिस महासंचालकांच्या पत्रामुळेच... 
मार्चएंड जवळ येऊ लागल्याने ई-चलनद्वारे ज्या बेशिस्त वाहनचालकांना दंड केला आहे, त्यांच्याकडील दंड तत्काळ वसूल करण्याची कार्यवाही करावी; अन्यथा संबंधितांचे वाहन परवाने रद्द करावेत, असे पत्र वाहतूक शाखेचे अप्पर पोलिस महासंचालकांनी सर्व वाहतूक पोलिसांना दिल्याची चर्चा आहे. वाहतूक शाखेला वसुलीचे उद्दिष्टही दिल्याने पार्किंगची सोय केलेली नसतानाही रस्त्यालगत लावलेली वाहने टोईंग वाहनातून उचलून नेली जात आहेत. दुसरीकडे, स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते खोदल्याने वाहनचालक विरुद्ध दिशेने काही अंतर पार करीत आहेत. मात्र, त्यांनाही प्रत्येकी एक हजाराचा दंड केला जात आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात आले नाहीत. सणासुदीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. पार्किंगची सोय नाही, रस्ते खोदल्याने रस्त्यांवरच वाहने लावली जात आहेत. तरीही वाहनचालकांना थांबवून वाहतूक पोलिस पावती करून त्यांना जागेवरच दंड भरा, असे बजावू लागल्याचे अनुभव काहींनी "सकाळ'कडे कथन केले. 

वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जाईल 
शहरात खरेदीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर मधला मारुती परिसरात पार्किंगसाठी जागा शोधली जात आहे. दोन दिवसांत जागा निश्‍चित करून त्या परिसरात खरेदीनिमित्ताने येणाऱ्या वाहनांची व्यवस्था केली जाईल. 
- सूर्यकांत पाटील, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक 

ठळक बाबी... 

  • होटगी रोडकडे जाताना महावीर चौकातच जीवघेणा खड्डा 
  • स्मार्ट सिटीअंतर्गत कामांमुळे रस्त्यांची खोदाई; वाहनचालकांची गोची 
  • सणासुदीतही महापालिकेने केली नाही गर्दीच्या ठिकाणी पार्किंगची सोय 
  • डफरीन चौक ते कामत हॉटेलपर्यंत महिन्यापूर्वी रस्ता खोदूनही होईना काम पूर्ण 
  • सरस्वती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्त्यांवर वाढले खड्डे 
  • दरवर्षीचा अनुभव पाठीशी असतानाही सणासुदीत गर्दी होणार नाही याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षच 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top