सोलापूर : बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

पंढरपूर : शिवशाहीर (कै.) बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे आज दुपारी येथे टाळ मृदंगाच्या गजरात चंद्रभागेत शोकाकूल वातावरणात विसर्जन करण्यात आले. शिवशाहीर (कै.) बाबासाहेब पुरंदरे अमर रहे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

स्व. बाबासाहेबांचा अस्थिकलश पुण्यातून आनंद जावडेकर आणि पंढरपूर येथील वैभव जोशी हे आज घेऊन आले. श्री विठ्ठल मंदिराच्या पश्‍चिमव्दार येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, शिवभक्त प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल शंकर बडवे, मुकुंदराव परिचारक, माजी उपनगराध्यक्ष व पक्षनेते अनिल अभंगराव, ऍड. संग्राम अभ्यंकर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अस्थिकलशांचे दर्शन घेऊन (स्व.) बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात दिंडीसह अस्थिकलश संत नामदेव पायरीजवळ आणि नंतर चंद्रभागेच्या तिरावर आणण्यात आला. तिथे अस्थींचे विधीवत पूजन करण्यात आले. तिथे ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी (कै.) बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

हेही वाचा: ....नाहीतर आम्हीच 'त्यांना' संपवू, नितेश राणेंचा इशारा

श्री. देगलूकर महाराज म्हणाले, वारकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या विषयी जो जिव्हाळा असतो, ज्या निष्ठा व समर्पण असते. त्याच भावना जिव्हाळा, निष्ठा, समर्पण (स्व.) बाबासाहेबांच्या ही मनात होत्याच. परंतु, त्याहून काकणभर अधिक त्यांचे प्रेम आणि समर्पण छत्रपती शिवरायांच्या चरणी होते. त्यांचे जीवन तृप्त होते. त्यांच्या ध्येयापर्यंत ते पोचले होते. त्यामुळे त्यांचे निधन हे एकाअर्थाने परमात्म स्वरुपाला प्राप्त होणे, संतांच्या चरणाला प्राप्त होणे, छत्रपती शिवरायांच्या चरणाला प्राप्त होणेच आहे, अशा शब्दात श्री. देगलूरकर महाराज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर होडीतून जाऊन चंद्रभागेत अस्थींचे शोकाकूल वातावरणात विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा: भारत-पाक युद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साजरा करण्यात आला 'इन्फन्ट्री डे'

याप्रसंगी शिवभक्त आणि (कै.) पुरंदरे यांच्याविषयी आदर असलेले लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.