
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरात दरमहा सरासरी १३० महिला कौटुंबिक त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेत आहेत. साडेदहा महिन्यांत १३०२ महिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे. ग्रामीणमध्ये ही संख्या दरमहा १०० पर्यंत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील ५० टक्के तक्रारींमध्ये समझोता होऊ शकलेला नाही.
पती-पत्नीच्या संसारात विश्वास हा महत्त्वाचा आहे. मात्र, संशय व एकमेकांबद्दल गैरसमज आणि आई-वडिलांची मुलांच्या संसारातील लुडबूड, यामुळे कौटुंबिक छळाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत आहे. मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास, घरातील कामे करून सासू-सासऱ्याची सेवा करणे अनेकांना अडचणीचे वाटते. तर मुलीच्या संसारात तिच्या माहेरचे लोक नेहमीच लुडबूड करतात. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होतात आणि त्यातून शिवीगाळ, मारहाण झाल्यावर पोलिसांत धाव घेतली जाते. विवाहातील मानपान, दागिने, पैसे, महागड्या वस्तू दिल्या नाहीत, मूलबाळ होत नाही, मुलगा झाला नाही, स्वयंपाक येत नाही, अशा कारणांतूनही महिलांचा छळ होत असल्याचे दाखल गुन्ह्यातून दिसते.
काहींचा विवाह झाल्यावर दोन-तीन महिन्यांतच तर काहींच्या विवाहानंतर १०-१२ वर्षांनंतर तक्रारी दाखल होत आहेत. सुरवातीला महिला सुरक्षा कक्षामार्फत (भरोसा सेल) कौटुंबिक वाद मिटविण्याचा प्रयत्न होतो. त्यात अनेकजण आपली चूक मान्य करतात व पुन्हा नव्याने संसार सुखाचा करतात. मात्र, अनेक महिला सततच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेतात. दुसरीकडे तक्रारदारांपैकी ३० ते ३५ टक्के तक्रारदार कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करतात, असेही दिसून येते.
कौटुंबिक तक्रारींवर यशस्वी समझोता
चालू वर्षात १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत कौटुंबिक छळाच्या साडेअकराशे तक्रारी महिला सुरक्षा कक्षाकडे (भरोसा सेल) दाखल झाल्या. त्यातील ५२३ तक्रारींमध्ये समझोता घडवून आणण्यात पोलिसांना यश मिळाले. मुला-मुलींच्या संसारात सासर-माहेरील लोकांची लुडबूड, मोबाईलमुळे वाढलेला संशय, विवाहातील मानपान, विसंवाद, एकमेकांना समजून न घेणे अशा प्रमुख कारणांतून कौटुंबिक तक्रारी वाढत आहेत.
- धनाजी शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, सोलापूर शहर
सोलापूर शहरातील तक्रारी...
एकूण तक्रारी
१३०२
आपसांत समझोता
६२३
कौटुंबिक न्यायालयात गेलेले
३४१
पोलिसांत गुन्हे दाखल
२९५
प्रलंबित तक्रारी
४३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.