esakal | लसीचा पहिला डोस घेतलेल्या 93 वर्षीय आजोबा व 52 वर्षीय मुलाने केली कोरोनाला चित !

बोलून बातमी शोधा

Shaikh

लसीचा पहिला डोस घेतलेल्या 93 वर्षीय आजोबा व 52 वर्षीय मुलाने केली कोरोनाला चित !

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : जगण्यातील आत्मविश्वास, डॉक्‍टरांचे अथक परिश्रम व कठीण काळात कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक व भावनिक आधाराच्या जोरावर 93 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. बशीर कमालसाहेब शेख (रा. मळेगाव, ता. बार्शी) असे आजोबांचे नाव आहे.

बशीर शेख व त्यांचा मुलगा गौस शेख (वय 52) यांना सर्दी व खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने डॉक्‍टरांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यात पिता- पुत्राची दोघांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. मुलगा गौस शेख यांची याअगोदर अँजिओग्राफी झालेली आहे. अशातच ऑक्‍सिजनची कमतरता, बेड्‌स उपलब्धता, रेमडेसिव्हीरचा तुटवडा, कोरोनाबाबत अवास्तव पसरलेली भीती यामुळे शेख कुटुंबीय पूर्णपणे भेदरून गेले होते.

हेही वाचा: मेंढरं राखणारा, ऊसतोड करणारा लोटेवाडीचा आबा "आयईएस'मध्ये देशात 21 वा

मळेगावचे पंचायत समिती सदस्य राजाभाऊ धोत्रे व शेख कुटुंबीयांनी बार्शीच्या डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल येथे संपर्क साधून बशीर शेख यांना ऍडमिट केले. तर गौस शेख यांना मळेगाव येथे शेतातच विलगीकरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपळे येथे दोघांनीही कोरोना प्रतिबंधक घेतलेली लस व वेळेत उपचार मिळाल्याने मळेगावचे बशीर शेख व गौस शेख यांनी अवघ्या दहा दिवसांत कोरोनावर मात करून एक सकारात्मक संदेश दिला आहे. यामुळे कोव्हिड झाला तरी लस आपल्याला मृत्यूपासून दूर ठेवते, याचे मूर्तिमंत उदाहरण शेख पिता-पुत्रांनी घालून दिले आहे.

हेही वाचा: जिल्ह्यातील तिघांनीच दिला आमदार निधी ! कोरोनासाठी दहा आमदारांकडून दमडाही नाही

एक उत्तम कुटुंबप्रमुख, शिक्षणप्रेमी, प्रगत शेतकरी म्हणून बशीर शेख यांची परिसरात ओळख आहे. 93 वर्षांचे बशीर शेख व 52 वर्षांचे गौस शेख यांनी कोरोनावर मात करून इतरांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण केली आहे. आजोबांनी बोलताना सांगितले, की कोरोनासारख्या आजारास न घाबरता वेळीच उपचार घेऊन सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार योग्यवेळी औषधोपचार घेतले की कोरोनावर नक्कीच मात करता येते. या कठीण प्रसंगी डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलचे डॉक्‍टर व स्टाफ, प्राथमिक उपकेंद्र, मळेगावचे आरोग्य कर्मचारी तसेच कुटुंबीयांचे सहकार्य मिळाले.