esakal | राळेरासमध्ये साजरा झाला अनोखा 'ट्रॅक्टर पोळा'!
sakal

बोलून बातमी शोधा

tractor pola

राळेरासमध्ये साजरा झाला अनोखा 'ट्रॅक्टर पोळा'!

sakal_logo
By
भीष्माचार्य ढवण

सासुरे (सोलापूर) : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. वर्षभर आपल्या मालकाची इमानेइतबारे सेवा करणाऱ्या बैलांचा सण म्हणून, बैल पोळा साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. पण आज काळ बदलला, शेतीचे आणि शेतकऱ्याचे जीवन पालटले असून, शेती क्षेत्रात क्रांती झाली.

हेही वाचा: पावसाने दिली आधी ओढ, आता पुराने वाहून नेले! खरिपाची पिके पाण्यात

कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला. शेतीत यांत्रिकीकरण आले आणि शेतकऱ्यांना बैलाची शेती परवडेना झाली, म्हणून बैलाची जागा आता ट्रॅक्टरने घेतली. आणि ट्रॅक्टरच शेतकऱ्यांचा सच्चा मित्र झाला. याचाच प्रत्यय म्हणून, बार्शी तालुक्यातील राळेरास येथे 'ट्रॅक्टर पोळा' साजरा करण्यात आला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा सण असतो.

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.बैलपोळा धुमधडाक्यात व्हायचा. काही गावात बेंजो, बँड लावून शेतकरी बेभान नाचायचे . जल्लोश करायचे.

हेही वाचा: पेरणीला आला अन्‌ आता काढणीलाच बरसला! उडदाच्या शेंगाही पाण्यात

परंतु काळ जसा पुढे जातोय तसतसी गावोगावी बैलजोड्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. बैलजोड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतीची सर्व कामे आता लहान-मोठ्या ट्रॅक्‍टरच्या माध्यमातूनच केली जातात आणि ही काळाची गरज बनली आहे. परंतु बैलांची कमी होत चाललेली संख्या धोक्याची घंटा तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. नाही म्हणायला आजही काही शेतकरी बांधवांकडे बैलजोड्या आहेत ते प्रथेनुसार बैलांची पूजा करताना दिसतात.

मात्र, बार्शी तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या राळेरास येथे जेमतेम दहा-बाराच बैलजोड्या राहिल्या आहेत. सर्रास शेतकऱ्यांकडील बैलांच्या दावणी ओस पडल्या असून त्या जागी ट्रॅक्टर उभे आहेत. आता शेतीच्या मशागतीची सर्व कामे म्हणजे कोळपणे, पाळी टाकणे, रोटरने, नांगरणे, पेरणीसह धान्य मळणीची कामे सुद्धा ट्रॅक्‍टरने करताना दिसत आहेत. त्यात गावोगावी बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने फवारणी सुध्दा ट्रॅक्टरने केली जाते. ट्रॅक्‍टरच्या वापरामुळे वेळ आणि शारीरिक कष्ट कमी लागते.

गावात लहान-मोठे मिळून जवळजवळ ४५ ट्रॅक्टर आहेत. बैलपोळ्याच्या दिवशी या आधुनिक शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टरना बैलासारखे सजवून, फुगे, गोंडे बांधून त्यांची गावातून सवाद्य कोरोनाचे नियम पाळून मिरवणूक काढली. मात्र, हे चित्र संस्कृतीच्या व प्रथेच्या विरोधात असल्याची मतमतांतरे जुन्या शेतकऱ्यांनी मांडली.

'बैलांची घटती संख्या भविष्यासाठी चिंतनिय आहे. पशुधन वाचले पाहिजे.'- उपसरपंच शांतिलाल पंके, राळेरास

'बैलाशिवाय बैलपोळा हे समीकरण रुचत नाही, परंतु आधुनिक शेतीचे तंत्र आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे'- गणेश पाटील, पोलिस पाटील, राळेरास

loading image
go to top