esakal | पेरणीला आला अन्‌ आता काढणीलाच बरसला! उडदाच्या शेंगाही गेल्या पाण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

पेरणीला आला अन्‌ आता काढणीलाच बरसला! उडदाच्या चार शेंगाही गेल्या पाण्यात

सध्या पडणारा पाऊस म्हणजे "पेरणीला आला होता नंतर आता काढणीलाच बरसला, पदरात पडणाऱ्या सोयाबीन, उडदाच्या चार शेंगा पाण्यात आणि मातीत घालून परतला' असा नुकसानकारक ठरू लागला आहे.

पेरणीला आला अन्‌ आता काढणीलाच बरसला! उडदाच्या शेंगाही पाण्यात

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर) : मागील चार ते पाच दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे (Heavy Rains) मोहोळ (Mohol), करमाळा (Karmala), माढा (madha) या तालुक्‍यातील शेतशिवारात काढणीला आलेल्या खरिपातील उडीद, सोयाबीन, मूग या पिकांचे (Crops) नुकसान होत असून, हा पाऊस असाच चालू राहिला तर पक्व झालेल्या शेंगा जागेवरच उगवतील की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे सध्या पडणारा पाऊस म्हणजे "पेरणीला आला होता नंतर आता काढणीलाच बरसला, पदरात पडणाऱ्या सोयाबीन, उडदाच्या चार शेंगा पाण्यात आणि मातीत घालून परतला' असा नुकसानकारक ठरू लागला आहे.

हेही वाचा: दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली !

यंदा पावसाळ्याच्या सुरवातीस वरुणराजाने कधी नव्हे ती दमदार हजेरी लावली आणि सोलापूर वगळता महाराष्ट्रात महापुराने धुमाकूळ घतला होता. त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यात मात्र समाधानकारक हजेरी लावली होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या अपेक्षेपेक्षा लवकर झाल्या. त्यानंतर मात्र वरुणराजाने चांगलीच ओढ दिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली तर अळी, किडीसह रोगराईचा प्रादुर्भाव वाढला. ऐन कळ्या - फुलांतील उडीद, सोयाबीन, मूग, मका या पिकांना पावसाने ओढ दिल्याने आणि नेमकी याच काळात म्हणजे ऑगस्टमध्ये ऑक्‍टोबर हीट जाणवू लागल्याने बहरात आलेली खरिपाची पिके माना टाकू लागली. कळ्या गळू लागल्या. अधूनमधून झालेल्या शिडकाव्याने चार-चार शेंगा दिसू लागल्या आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या सर्वदूर दमदार पावसाने गेल्या वर्षीसारखी पूरपरिस्थिती निर्माण होते की काय, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतातील खरिपाचे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांत पाणी साचले आहे. जादा पाणी झाल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. तर पक्व झालेल्या शेंगा काळ्या पडू लागल्या आहेत. हा पाऊस पुढील तीन-चार दिवस असाच सुरू राहिला तर काढणीस आलेल्या उडीद, मूग आणि सोयाबीनच्या शेंगा जागेवरच उगवतात की काय, अशी भीती शेतऱ्यांना भेडसावू लागली आहे.

हेही वाचा: बोरगाव-घोळसगावच्या वाहत्या ओढ्याच्या पुलावरून जीवघेणा प्रवास!

आमचा दोन एकर उडीद काढणीला आला आहे. शेंगा पक्व झाल्याने गळून जात आहेत. शेंगा काळ्या पडत आहेत. हा पाऊस असाच चालू राहिला तर शेंगा जागेवरच उगवतील की काय अशी भीती वाटते. या पावसाने शेतातील उडीद पिकाचे वाटोळे झाले आहे.

- गणेश शिंदे, शेतकरी, देगाव (वा), ता. मोहोळ

loading image
go to top