esakal | पावसाने दिली आधी ओढ, आता पुराने वाहून नेले! खरिपाची पिके पाण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने दिली आधी ओढ, आता पुराने वाहून नेले! खरिपाची पिके पाण्यात

जून, जुलैमध्ये पावसाने ओढ देणे आणि उर्वरित पावसाळ्यात कमी वेळात जास्त पाऊस पडणे हे आता नेहमीचेच झाले आहे.

पावसाने दिली आधी ओढ, आता पुराने वाहून नेले! खरिपाची पिके पाण्यात

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने (Rain) ओढ दिली. ज्यांना शक्‍य आहे त्यांनी पाणी देऊन पिके (Crops) जगवली. मात्र, आता हातातोंडाशी आलेला घास मागील दोन दिवसांत झालेल्या मोठ्या पावसाने हिरावून नेला आहे. बार्शी (Barshi), माढा (Madha), करमाळा (Karmala), मोहोळ (Mohol) तालुक्‍यात दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) खरीप हंगाम वाया गेला आहे. सीना नदीकाठच्या (Seena River) शेतकऱ्यांची तर संपूर्ण पिकेच वाहून गेली आहेत.

हेही वाचा: शिवसेना आमदार सावंतांविरुद्ध पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीच तक्रार!

जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाच्या दुष्परिणामामुळे पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलैमध्ये पावसाने ओढ देणे आणि उर्वरित पावसाळ्यात कमी वेळात जास्त पाऊस पडणे हे आता नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे मागील जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने या काळात अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सुकून गेली. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर रोटर फिरवला तर ज्या शेतकऱ्यांनी शक्‍य आहे, त्यांनी पाणी देऊन पिके जगवली. मात्र, आता काढणीला आलेली पिके मागील दोन दिवसांत झालेल्या मोठ्या पावसाने वाया गेली आहेत.

भाजीपाला उत्पादक दुहेरी संकटात

सध्या भाजीपाला उत्पादक दुहेरी संकटात आहेत. बाजारात कोणत्याही भाजीपाल्याला दर नाही. ढोबळी मिरची, टोमॅटो यांसारखी खर्चिक पिके रस्त्यावर टाकून द्यावी लागत आहेत. इतर भाजीपाल्यांनाही अपेक्षित दर मिळत नव्हता. गौरी-गणपतीच्या सणात अनेक प्रकारच्या भाज्या आवश्‍यक असतात, त्यामुळे या कालावधीत तोडणीस येतील अशा भाज्यांच्या लागवडी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, यंदा अगोदर पिकलेल्या भाजीपाल्याला दर मिळालेला नाही. सणासुदीच्या काळात तोडणीस येणारी पिकेही अतिपावसामुळे वाया गेली आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.

कांदा लागवड वाया जाणार

मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते. सध्या कांदा लागवडी सुरू आहेत. कांदा लहान असताना मोठा पाऊस पडला आणि शेतात नदी, नाल्याचे पाणी शिरले तर पिके वाया जातात. यंदा सीना, भोगावती व बार्शी तालुक्‍यातील घोरड्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या परिसरातील अनेक लहान- मोठे ओढे, नाले कमी वेळेत अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडल्याने भरून वाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी नुकत्याच केलेली कांदा लागवडी वाया गेल्या आहेत. यामुळे कांदा बियाणे, मशागत, लागवड याचा खर्च वाया गेला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा: पेरणीला आला अन्‌ आता काढणीलाच बरसला! उडदाच्या शेंगाही पाण्यात

ठळक बाबी

  • कांदा, उडीद, मूग, तूर सोयाबीन पिकांचे नुकसान

  • अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या मोटारी, पेटी, स्टार्टर यांचे नुकसान

  • काढणीयोग्य झालेल्या भाज्या, फळभाज्यांचे नुकसान

  • नदीकाठच्या मका, ऊस व वैरणीची पिके वाया जाण्याची भीती

एकूण खरीप पेरणी (हेक्‍टरमध्ये)

  • तूर : 931

  • उडीद : 699

  • सोयाबीन : 694

  • मका : 400

  • चारा व इतर : 641

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)

तालुका : जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर

उत्तर सोलापूर : 373.6 - 458.7 - 35.7 - 39.3

दक्षिण सोलापूर : 353.9 - 411.1 - 36.6 - 39.8

बार्शी : 355.5 - 391.2 - 34.5 - 48.0

अक्कलकोट : 369.5 - 381.9 - 34.8 - 25.2

मोहोळ : 282.5 - 376.7 - 35.0 - 45.2

माढा : 301.2 - 351.6 - 34.8 - 37.8

करमाळा : 284.7 - 287.0 - 34.6 - 41.3

पंढरपूर : 300.8 - 364.8 - 37.7 - 21.7

सांगोला : 270.3 - 348.7 - 39.6 - 29.5

माळशिरस : 269.2 - 277.2 - 31.6 - 37.5

मंगळवेढा : 252.4 - 369.6 - 36.3 - 19.2

सोलापूर जिल्हा : 304.8 - 360.1 - 35.3 - 20.8

हेही वाचा: दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली !

शनिवारी मध्यरात्री व रविवारी सायंकाळी ढाळे पिंपळगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या दोन एकर शेतातील उडदाचा नुसता चिखल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

- परमेश्वर काशीद, उडीद उत्पादक शेतकरी, ढाळे पिंपळगाव, ता. बार्शी

आमचा दोन एकर उडीद काढणीला आला आहे. शेंगा पक्व झाल्याने गळून जात आहेत. शेंगा काळ्या पडत आहेत. हा पाऊस असाच चालू राहिला तर शेंगा जागेवरच उगवतील की काय? अशी भीती वाटते. या पावसाने शेतातील उडीद पिकाचे वाटोळे झाले आहे.

- गणेश शिंदे, शेतकरी, देगाव (वा), ता. मोहोळ

loading image
go to top