esakal | दुसऱ्या डोससाठीही मिळेना लस ! 29 लाख व्यक्‍तींना लस नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

कोविशिल्ड लस

दुसऱ्या डोससाठीही मिळेना लस ! 29 लाख व्यक्‍तींना लस नाहीच

sakal_logo
By
तात्या लांडगे

कोरोनाचा मृत्यूदर रोखण्यासाठी प्रतिबंधित लस टोचली जात आहे. उद्दिष्टानुसार सोलापूर जिल्ह्यातील 35 लाख 78 हजार 32 जणांना लस टोचणे अपेक्षित आहे.

सोलापूर : कोरोनाचा (Covid-19) मृत्यूदर रोखण्यासाठी प्रतिबंधित लस (Vaccine) टोचली जात आहे. उद्दिष्टानुसार सोलापूर जिल्ह्यातील 35 लाख 78 हजार 32 जणांना लस टोचणे अपेक्षित आहे. आतापर्यंत त्यातील सहा लाख 22 हजार 998 जणांना पहिला डोस तर त्यातील पावणेदोन लाख व्यक्‍तींनाच दुसरा डोस मिळाला आहे. अजूनही 29 लाख व्यक्‍ती लसीच्या प्रतिक्षेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण करूनही 34 हजार 683 व्यक्‍तींना दुसरा डोस मिळालेला नाही. (In Solapur district, 29 lakh people have not been vaccinated against corona-ssd73)

हेही वाचा: "कोपर्डीच्या कन्येला न्याय मिळण्यासाठी काढावा लागेल मोर्चा!'

तिसऱ्या लाटेत आपल्या कुटुंबातील कर्ते पुरुष, तरुण मुले सुरक्षित राहावीत, या हेतूने लसीकरणासाठी केंद्रांबाहेर (Vaccination Center) लांबलचक रांगा लागत आहेत. ऑनलाइन नोंदणी करूनही लस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी टोकन सिस्टीम सुरू केली आहे. त्यासाठी अनेकजण पहाटे साडेपाच - सहापासून रांगेत उभारत असल्याची स्थिती सोलापूर शहरात पाहायला मिळत आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास तो रुग्ण सहजपणे बरा होतो, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) नोंदविले आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिक लस टोचून घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात लस मिळत नाही तर दुसरीकडे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातच लसीचा तुटवडा असल्याचे लोकप्रतिनिधी व अधिकारी सांगत आहेत. उद्दिष्टानुसार हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाइनवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून त्यातील काहींनी दुसरा डोस घेतलेला नाही. दुसरीकडे 45 ते 59 वयोगटातील नऊ लाख 67 हजार आणि 60 वर्षांवरील पावणेपाच लाख तर 18 ते 44 वयोगटातील 21 लाख 25 हजार 471 जणांचे लसीकरणे केले जाणार आहे. मात्र, लसीअभावी हे उद्दिष्ट कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: कॉलेज सकाळी तर शाळा दुपारी! जिल्ह्यात उद्यापासून 345 शाळा उघडणार

84 दिवसांच्या निकषाला बगल

सुरवातीला कोरोनावरील प्रतिबंधित लस (कोविशिल्ड) (Covishield) घेतल्यानंतर 45 दिवसांत दुसरा डोस घ्यावा, असा निकष होता. त्यानंतर त्यात बदल करण्यात आला आणि आता 84 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जात आहे. तर कोवॅक्‍सिन (Covaccin) लसीचा दुसरा डोस 30 दिवसांनंतर घ्यावा, असाही निकष आहे. तरीही, कोवॅक्‍सिन लस घेतलेल्या जिल्ह्यातील एक हजार 489 तरुणांना 30 दिवसांनंतरही दुसरा डोस मिळालेला नाही. तर कोविशिल्ड लस घेऊन 90 दिवसांहून अधिक काळ लोटला तरीही, 34 हजार 683 जणांना दुसरा डोस मिळालेला नाही.

जिल्ह्यात लसीची मागणी वाढली आहे, परंतु तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने आठवड्यातून काही दिवस लसीकरण बंद ठेवावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. आज सोलापूर जिल्ह्यासाठी दहा हजार 200 डोस मिळाले असून त्यातील 30 टक्‍के लस शहरासाठी तर उर्वरित लस ग्रामीणसाठी दिली जाईल.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

लसीकरणाची स्थिती

  • एकूण उद्दिष्ट : 35,78,032

  • आतापर्यंतचे लसीकरण : 6,22,998

  • दुसरा डोस मिळालेले : 1,75,593

  • 18 ते 44 वयोगटाचे उद्दिष्ट : 21,35,471

  • लस मिळालेलेले तरुण : 73,902

loading image