esakal | शिक्षकांना सर्व्हेची 45 दिवस ड्यूटी ! ड्यूटी करणारे 18 शिक्षक पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

Corona Survey

शिक्षकांना सर्व्हेची 45 दिवस ड्यूटी ! ड्यूटी करणारे 18 शिक्षक पॉझिटिव्ह

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी 9 एप्रिलपासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षक घरोघरी जाऊन सर्व्हेची जबाबदारी पार पाडत आहेत. सध्या कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूदर वाढत असतानाही शिक्षक सर्व्हेची ड्यूटी करीत आहेत. सद्य:स्थितीत कोरोना ड्यूटी करणाऱ्या 18 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून, एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. शिक्षकांना आता 45 दिवसांचीच ड्यूटी दिली जाणार आहे.

घरोघरी जाऊन एका कुटुंबातील किती सदस्यांनी कोरोनावरील लस घेतली, को-मॉर्बिड रुग्णाला काही त्रास आहे का, कुटुंबातील सदस्याला काही लक्षणे आहेत का, त्यांचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल किती आहे, याची माहिती सर्व्हेच्या माध्यमातून घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात सध्या 28 ते 40 वयोगटातील शिक्षकांना ड्यूटी देण्यात आली आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागातील जवळपास चार हजार शिक्षकांना टप्प्या- टप्प्याने ड्यूटी दिली जाणार आहे. परंतु अपंग, गर्भवती, को- मॉर्बिड, कोरोना बाधित अथवा कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित झालेल्यांना ड्यूटी दिली जाणार नाही, असे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: मृत आजीचं अख्खं कुटुंब क्वारंटाइन ! खाकी वर्दी आली धावून अन्‌ केला अंत्यविधी

दरम्यान, मे 2020 च्या आदेशानुसार कोरोना सर्व्हे करताना मृत झालेल्यांना 50 लाखांची मदत देण्याचा निर्णय झाला. परंतु, कोरोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी तथा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 14 दिवस संबंधित शिक्षक अथवा कर्मचारी कोरोना सर्व्हेच्या कामावर असणे बंधनकारक आहे. कोरोनाची ड्यूटी करणाऱ्या शिक्षिका वासंती गंगणे यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

"उच्च' शिक्षकांनाही कोरोना ड्यूटी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, मृत्यूदर आटोक्‍यात आणण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत महापालिकेने कोरोना सर्व्हेसाठी घेतली. मात्र, एप्रिल 2020 पासून त्याच त्या शिक्षकांना सर्व्हे, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसह अन्य कामे करावी लागत आहेत. त्यामुळे आता दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर या वर्गातील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार असून आयटीआय, पॉलिटेक्‍निक कॉलेज, जीएसटी, कृषी, ऑडिट यासह सात विभागांच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना संबंधित कामे करावी लागणार आहेत. तसेच शहरातील उच्च महाविद्यालयातील प्राध्यापकांचीही माहिती मागविण्याचे आदेश आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनाही ही कामे करावी लागणार आहेत.

हेही वाचा: पालकमंत्र्यांची पोलिस बंदोबस्तात बैठक ! बंदोबस्ताचे "हे' होते कारण

आयुक्‍तांकडे मागणी करूनही दखल नाही

मागील वर्षापासून शहरातील शिक्षक कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग, नाकाबंदीसह घरोघरी जाऊन सर्व्हेची ड्यूटी करीत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी थर्मल गन, मास्क, सॅनिटायझर द्यावे, अशी मागणी आयुक्‍त पी. शिवशंकर, उपायुक्‍त धनराज पांडे, जमीर लेंगरेकर यांच्याकडे शिक्षण विभागाने नोंदविली आहे. मात्र, बहुतेक शिक्षकांना काहीच साहित्य मिळाले नाही. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने तशी मागणी नोंदविली आहे. तर सिंहगड कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका शिक्षिकेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी असा त्रास होत होता. त्या ठिकाणी त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते, असाही अनुभव प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितला. आता आयुक्‍त पी. शिवशंकर त्यांच्या मागणीकडे लक्ष देतील का, याची उत्सुकता लागली आहे.