esakal | ऑक्‍सिजन अन्‌ व्हेंटिलेटर बेड नाहीच ! रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी

बोलून बातमी शोधा

Oxygen Bed

ऑक्‍सिजन अन्‌ व्हेंटिलेटर बेड नाहीच ! रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यात ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. लक्षणे असतानाही आजार अंगावर काढून विलंबाने अनेकजण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. तर दुसरीकडे, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेल्या काही (को-मॉर्बिड) रुग्णांनाही ऑक्‍सिजनची गरज भासू लागली आहे. मात्र, ऑक्‍सिजन बेड हाउसफुल्ल झाल्याने रुग्णाला घेऊन नातेवाईक हॉस्पिटलच्या दारोदारी फिरू लागल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सद्य:स्थितीत शहरात तीन हजार 360 तर ग्रामीण भागात दहा हजार 699 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत. त्यातील अंदाजित दोन हजार 600 रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरची गरज आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे शहर- जिल्ह्यात सध्या एक हजार 113 ऑक्‍सिजन बेड तर 215 व्हेंटिलेटर बेड आहेत. कोरोना रुग्णांची दररोज सरासरी दीड हजाराने वाढ होत असून त्यातील किमान अडीचशे ते तीनशे रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज पडू लागली आहे. त्यामुळे कोव्हिड नसलेल्या रुग्णांना सध्या कुठेही बेड मिळत नसल्याचीही स्थिती पाहायला मिळत आहे. ऑक्‍सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हीर पुरेशा प्रमाणात नाहीत, लसीची मागणी सहा ते साडेसहा लाखांपर्यंत असतानाही त्याचा पुरवठा होत नाही. कोणतीच वस्तू मुबलक मिळत नसल्याने मृत्यूदर वाढतोय, अशीही चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: स्टेट बॅंक भरणार क्‍लर्कची पाच हजारांवर पदे ! अर्ज प्रक्रिया झाली सुरू; जाणून घ्या सविस्तर

बेडची सद्य:स्थिती

  • एकूण बेड्‌स : 20,153

  • व्हेंटिलेटर : 215

  • ऑक्‍सिजन बेड्‌स : 1,113

  • शिल्लक ऑक्‍सिजन बेड : 34

व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड कमीच

कोरोनाची लागण झालेल्या एकूण ऍक्‍टिव्ह रुग्णांपैकी 15 ते 20 टक्‍के रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरची गरज आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या पाठपुराव्यातून दररोज ऑक्‍सिजनचा साठा रुग्णालयांना पुरविला जात आहे. व्हेंटिलेटर बेड सध्या गुंतले असून ऑक्‍सिजन बेड शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 34 शिल्लक आहेत.

- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच बेड

पूर्वीचा गंभीर आजार असलेली एका 72 वर्षीय महिलेला धाप लागत असल्याने व छातीत कफ झाल्याने त्यांचे नातेवाईक वसंत विहार येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली आणि तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांची ऑक्‍सिजन लेव्हल 90 पर्यंत असल्याने त्यांना ऑक्‍सिजनची गरज असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, आमच्याकडे ऑक्‍सिजन बेड शिल्लक नसून तुम्ही दुसरीकडे रुग्णाला घेऊन जा, असा सल्ला नातेवाइकांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी जुळे सोलापूर परिसरातील तीन रुग्णालयांस भेट दिली आणि त्यातील दोन रुग्णालयांनीही ऑक्‍सिजन बेड नसल्याचे उत्तर दिले. नातेवाइकांची चिंता वाढली आणि त्यांनी तिसऱ्या हॉस्पिटलची वाट धरली. दोन-तीन तास फिरल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात तात्पुरते दाखल करून घेतले आणि त्यानंतर काही तासांनी ऑक्‍सिजन बेड मिळाला आणि उपचार सुरू झाले. तत्पूर्वी, कामगार विमा रुग्णालयात संपर्क केला. तेथे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच ऑक्‍सिजन बेड मिळेल, असेही उत्तर मिळाल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

बेड्‌सची ऍडव्हान्स बुकिंग

शहरात दररोजची रुग्णसंख्या कमीच आहे, परंतु पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्यांचाच सर्वाधिक समावेश आहे. सर्वोपचार रुग्णालयातील 310 बेड कायमस्वरूपी गुंतलेल्याच असतात. उर्वरित सहकारी रुग्णालये असो वा खासगी रुग्णालयांमध्ये अनेकजण घरातील सदस्यांना त्रास होत असताना दवाखान्यात जाण्यापूर्वीच बेड ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवत असल्याचाही अनुभव अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना येऊ लागला आहे. महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी काही दिवसांपूर्वी याच मुद्‌द्‌यावर बोट ठेवत, नागरिकांसह रुग्णालयांना आवाहन केले होते. मात्र, त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.