esakal | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : "पांडुरंग'च्या उपाध्यक्षावर "विठ्ठल'चा संचालक भारी !
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal_Pandurang

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : "पांडुरंग'च्या उपाध्यक्षावर "विठ्ठल'चा संचालक भारी !

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरच्या निवडणुकीत कासेगाव (Kasegaon) जिल्हा परिषद गटाची भूमिका नेहमीच महत्त्वाची मानली जाते. मागील तिन्ही निवडणुकीत कासेगावकरांनी आमदार भारत भालकेंना (MLA Bharat Bhalke) मताधिक्‍य दिले होते. त्यानंतर आता पोटनिवडणुकीतही (Pandharpur By-Election) त्यांचे पुत्र भगीरथ भालकेंच्या (Bhagirath Bhalke) पारड्यात अधिक मतांचे दान टाकले आहे. कासेगावमधून 661 तर जिल्हा परिषद गटातून एकूण 1 हजार 461 इतके मताधिक्‍य भालकेंना मिळाले आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख यांच्यापेक्षा "विठ्ठल'चे संचालक विजयसिंह देशमुख हे भारी ठरल्याची चर्चा सुरू आहे. (In the Pandharpur assembly by-election, Bhalke got more votes from Kasegaon and Zilla Parishad groups)

पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक विविध अंगाने चर्चेची ठरली, तशी ती राज्यभरात देखील चांगलीच गाजली. अटीतटीच्या या पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यावर अवघ्या 3 हजार 733 इतक्‍या मतांनी बाजी मारली. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची पुरती फजिती झाली. निवडणुकीतील जय- पराजयानंतर वरिष्ठ नेत्यांचे विचारमंथन सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही गट आणि गावनिहाय मिळालेल्या मतांची बेरीज- वजाबाकी सुरू केली आहे. त्यातून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत केलेल्या कामाचे मूल्यमापन समोर येऊ लागले आहे.

हेही वाचा: "ओन्ली बेड अँड हॉस्पिटल !' व्हॉट्‌सऍप ग्रुपने वाचवले अनेक कोरोना रुग्णांचे प्राण

कासेगाव जिल्हा परिषद गट हा परिचारकांचा बालेकिल्ला मानला जातो. येथूनच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख यांनी 2018 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालकेंचा पराभव केला होता. त्यामुळे पोटनिवडणुकीकडे कासेगाव गटातून कोणाला किती मताधिक्‍य मिळणार, याची उत्सुकता होती. निवडणूक प्रचारादरम्यान वसंत देशमुख व प्रशांत देशमुख यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना तर विजयसिंह देशमुखांनी भगीरथ भालकेंना मताधिक्‍य देण्याचे आश्वासन दिले होते. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील कासेगावमधून आमदार भारत भालकेंना 1 हजार 800 इतके मताधिक्‍य मिळाले होते. दीड वर्षानंतर कासेगावसह गटात अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. तरीही विठ्ठलचे संचालक विजयसिंह देशमुखांनी अखेरपर्यंत खिंड लढवून कासेगावमधून 661 तर गटातील 9 गावांमधून एक हजार 4 51 इतके मताधिक्‍य भालकेंना दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोघा देशमुखांना एक देशमुख भारी पडल्याची जोरदार चर्चा कासेगाव परिसरात सुरू आहे.

हेही वाचा: शुक्रवारी नवे 2123 कोरोनाबाधित ! 56 जणांचा मृत्यू; ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 19353

विजयसिंह देशमुखांनी लावली शक्ती पणाला

पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदावरून अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्या वेळी भगीरथ भालकेंनी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुखांची पाठराखण केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील पाटील गट भालकेंवर नाराज होता. ही नाराजी दूर करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोनवेळा मध्यस्थी करून वाद मिटवला होता. या सगळ्या वादावादीनंतर राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या गावातून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळणार, की विरोधी भाजप उमेदवार बाजी मारणार? याचीही उत्सुकता होती. यामध्ये विजयसिंह देशमुख यांनी आपली शक्ती पणाला लावून कासेगावसह गटातील इतर गावांतूनही भालकेंना मताधिक्‍य मिळवून देत पक्षाची बूज राखली आहे.