esakal | लसीचे महत्त्व पटल्याने पहिल्या व दुसऱ्या डोससाठी गर्दी ! मात्र तुटवड्यामुळे नाराजी

बोलून बातमी शोधा

Vaccination
लसीचे महत्त्व पटल्याने पहिल्या व दुसऱ्या डोससाठी गर्दी ! मात्र तुटवड्यामुळे नाराजी
sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : कोरोनाचा उद्रेक वाढल्याने लस घेणाऱ्यांच्या संख्येत आता मोठी वाढ होऊ लागली आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परतावे लागत आहे. अशातच सध्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसींपैकी पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांचे गुणोत्तर (प्रमाण) ठरवून लसीकरण करायला हवे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

लसीकरणास प्रारंभ झाला त्या वेळी लस घेणाऱ्यांची संख्या कमी असायची. त्यामुळे अनेक केंद्रांवर लस शिल्लक राहायची. केंद्रावरील डॉक्‍टर्स व स्टाफ लस सुरक्षित असल्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करून लस घेण्याचे आवाहन करीत होते. काही केंद्रांवर तर केंद्रातील कर्मचारी नागरिकांशी संपर्क साधून लस घेण्यासाठी बोलवायचे, अशी स्थिती होती. मात्र, अनेक नागरिक लसीबाबत अनाठायी भीती बाळगून लस घेण्याचे टाळायचे. त्यात प्रारंभी 45 वर्षांवरील को-मॉर्बिड व त्यानंतर 45 वर्षांवरील व्यक्तींना सरसकट लस देण्याचे बंधन होते. लसीचे महत्त्व हळूहळू पटू लागल्याने नागरिकांकडून लसीकरणास प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे अनेकांनी फेब्रुवारी, मार्चमध्ये लस घेतली.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध ! आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी

दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांच्या आत घेतला तरच त्याचा चांगला परिणाम रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात होत असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांच्या संख्येत लसीकरण केंद्रावर सध्या गर्दी दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिला डोस घेण्यासाठी देखील नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागत आहेत. परंतु केंद्रावर उपलब्ध लसीइतकी नोंदणी पूर्ण झाल्यावर अनेकजण हताश होत आहेत. त्यात दुसरा डोस घेणाऱ्यांचाही अंतर्भाव आहे. केंद्रांवर लसीकरणासाठी होणारी गर्दी पाहता, पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस आपल्याला निर्धारित वेळेत मिळेल की नाही, याची चिंता सतावत आहे.

अशातच 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचे धोरण केंद्राने जाहीर केल्याने पुढील दहा दिवसांत प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. परिणामी लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळणार आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी प्रत्येक केंद्रावर उपलब्ध लसीच्या प्रमाणात गुणोत्तर ठरविण्याची गरज आहे; तरच दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांच्या आत घेणे नागरिकांना शक्‍य होईल.