esakal | कोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध ! आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी

बोलून बातमी शोधा

Death Audit
कोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध ! आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरात मागील 18 दिवसांत पाच हजार 155 रुग्ण वाढले असून त्यातील 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूदर वाढण्याच्या कारणांचा शोध आता खुद्द महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनीच घ्यायला सुरवात केली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांचा इतिहास तपासून तो कोणत्या रुग्णालयात उपचार घेत होता, त्या डॉक्‍टरांनी त्यांची कोरोना टेस्ट केली का, महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला त्याची खबर दिली का, याचा शोध त्यातून घेतला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अनेकजण सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असतानाही कोरोना टेस्ट करून घेत नसल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक रुग्णालयांत तसे रुग्ण परस्पर किरकोळ उपचार घेऊन घरी परत जात आहेत. काही दिवसांनी आजार वाढल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत असून अशा रुग्णांचाच मृत्यू होत असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील मृत्यूदर कमी करून कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्‍तांनीच कंबर कसली आहे.

हेही वाचा: राज्यात होणार आठ दिवसांचा कडक लॉकडाउन ! जाणून घ्या नेमके कारण

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आयुक्‍तांनी खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र आदेश काढून त्यांना सक्‍त सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची नोंद दररोज ठेवावी, कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची उपचारापूर्वी कोरोना टेस्ट करावी अथवा त्यांची माहिती जवळील नागरी आरोग्य केंद्राला द्यावी, असे निर्देश दिले होते. मात्र, काही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नोंदी अद्ययावत नाहीत, काही रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट न करताच त्यांच्यावर तात्पुरते इलाज केल्याची बाब आयुक्‍तांच्या निदर्शनास आली. त्यामुळे आयुक्‍तांनी आता खासगी रुग्णालयांवरच कारवाई सुरू केली आहे.

संबंधित डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल होणार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण माहिती दररोज तपासली जाईल. त्यात एखाद्या खासगी डॉक्‍टरांनी त्या रुग्णाची माहिती लपवून, लक्षणे असतानाही कोरोना टेस्ट न करताच त्यांच्यावर परस्पर उपचार केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

हेही वाचा: एकाच चितेवर बापासह दोन मुलींचा अंत्यविधी ! सावडीकरही हळहळले

डेथ ऑडिट कमिटीची स्थापना

शहरातील मृतांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची नियुक्‍ती केली आहे. शहरात दररोज मृत्यूचे प्रमाण वाढत असून कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी उशिरा दाखल होणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे मृत्यूची नेमकी कारणे काय आहेत, याचा शोध दररोज घेतला जात आहे. यातून निश्‍चितपणे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास या कमिटीने व्यक्‍त केला आहे.