esakal | आखाड्यातील अपक्ष उमेदवारच ठरणार प्रमुख उमेदवारांच्या जय-पराजयास कारणीभूत ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhalke_Awtade

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीबरोबरच राज्यातील गोंधळलेली राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून प्रतिष्ठेची केली जाणार आहे. मात्र आखाड्यातील अपक्ष उमेदवारच या प्रमुख उमेदवारांच्या जय- पराजयास कारणीभूत ठरणार आहेत. 

आखाड्यातील अपक्ष उमेदवारच ठरणार प्रमुख उमेदवारांच्या जय-पराजयास कारणीभूत ! 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक "विठ्ठल'चे अध्यक्ष भगीरथ भालके व "दामाजी'चे अध्यक्ष समाधान अवताडे या तुल्यबळ उमेदवारांबरोबर म्हणजेच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढली जाणार आहे. निवडणूक सहानुभूतीबरोबरच राज्यातील गोंधळलेली राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून प्रतिष्ठेची केली जाणार आहे. मात्र आखाड्यातील अपक्ष उमेदवारच या प्रमुख उमेदवारांच्या जय- पराजयास कारणीभूत ठरणार आहेत. 

स्व. भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर करत असताना आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्यात मनोमीलन घडवत दोघांपैकी एक उमेदवार दिल्यास आपण ही जागा हस्तगत करू, असा विश्वास देत दोघांत एकमत करण्यात यश मिळवले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वारंवार आरोप करून कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोडत नाहीत. त्यामुळे राज्यातील सरकार व त्यामधील मंत्री वारंवार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्ये गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ता बदलाची चर्चा जोर धरत आहे. 

पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढली जाणार आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा ओढवलेला रोष, तोडलेली वीज जोडणी, पिकांचे ढासळलेले दर, वारंवार लॉकडाउनची चर्चा यावरून असलेली नाराजी मतदार मतपेटीतून व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजीचे संकेत राज्यभर दाखवले जाणार आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्व. भारत भालके यांच्याबद्दल असलेली सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब करत अखेर एकास एक उमेदवार देण्यात आले. राष्ट्रवादीकडून स्व. भालके यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, शिवसेना, कॉंग्रेस व इतर मित्र पक्षांच्या आघाडीतून हा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो या दृष्टीने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून लक्ष घातले जाणार आहे. 

अर्थसंकल्पात बसवेश्वर स्मारकासाठी केलेली तरतूद राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरणार आहे. पंधरा दिवसात भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी प्रणिती भालके यांनी होम टू होम प्रचार करून जनतेमध्ये स्व. भालके यांच्याबद्दल असलेली सहानुभूती जाणून घेतली. भगीरथ भालके यांच्याबद्दल तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली. अनेक गावांत सेल्फीसाठी गर्दी दिसून आली. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चर्चेतील नगरपालिकेतील गटबाजी संपुष्टात आली. त्याचे मतात रूपांतर होणे देखील आवश्‍यक आहे. 

परंतु, पक्षीय पातळीवरील चुरशीच्या लढतीबरोबर या मतदारसंघात सध्या एक ना अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये रखडलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पिण्याच्या पाण्यासाठीची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, चोखामेळा यांचे स्मारक, शिधापत्रिका नूतनीकरणासाठीचा त्रास, वारंवार लॉकडाउन लावल्यामुळे लोकांना उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी, यंदाच्या खरीप पीक विमापासून 80 टक्केपेक्षा अधिक शेतकरी वंचित आहेत हे मुद्दे प्रचारामध्ये चर्चेला येणार आहेत. 

दोन्ही उमेदवार तुल्यबळ आणि साखर कारखानदार आहेत. त्यामुळे ऊसदर आणि कारखानदारी हे मुद्दे प्रचारामध्ये येणार नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मात्र कारखानदारीच्या मुद्द्यावर जोर दिला जाणार आहे तर याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन पाटील, शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर आज खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे हे देखील अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांचे अर्ज राहिले तर निवडणुकीत आणखीन रंगत निर्माण होणार असली तरी हे उमेदवार कुणाच्या तरी पराभवास कारणीभूत ठरणार, हे मात्र नक्की आहे. त्यामुळे अर्ज काढण्याच्या अंतिम दिवशी यातील उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी कोणता पक्ष यशस्वी होतो, हे देखील विजयासाठी कारणीभूत ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image