
सोलापूर : वडील हातभट्टीच्या आहारी, घरी पत्नीसोबत सतत भांडण, याला वैतागून विवाहिता भावाकडे राहायला कुरुल (ता. मोहोळ) येथे गेली. तीन मुली, एक मुलगा आणि पती मद्यपी, यांची जबाबदारी खांद्यावर घेत त्या विवाहितेने संसार नेटाने केला. तिन्ही मुलींचे विवाह झाले, पतीमध्ये सुधारणा झाली, मुलगा मोठा झाला. आता ती विवाहिता पती व एकुलत्या एक मुलाला घेऊन सासरी आली. पण, मुलगा गावात सहज उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीच्या आहारी गेला आणि त्याने वडिलांना मारले, दोन एकर जमीन विकली. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून गाव सोडलेल्या त्या विवाहितेच्या नशिबी पुन्हा पहिल्यासारखीच स्थिती ओढवली आहे. ही व्यथा आहे पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) गावची.