‘या' नेत्याने सांगितले अन्‌ उजनी धरणाची जागा बदलली; खरी जागा तुम्हाला माहितीये का?

A story about the construction of Ujani Dam in Solapur district
A story about the construction of Ujani Dam in Solapur district

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वांत कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. तरी या जिल्ह्याला उजनी धरणाने वैभव प्राप्त करून दिलं आहे. या जिल्ह्यात कमी पाऊस पडत असला तरी पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने हे धरण भरते आणि सोलापूरची तहान भागते. फक्त शेतीच नाही तर उद्योगांना आणि पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, भिगवण या भागाला या धरणातूनच पाणी जाते. हे धरण आता ज्या ठिकाणी आहे, तिथे नव्हे तर दुसऱ्याच ठिकाणी होणार होते. मात्र, जास्त नागरिकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून जागा बदलण्यात आली. 
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे पावसाळा सुरु झाला पुणे जिल्ह्यातील पावसाकडे लक्ष लागते. सोलापूर जिल्ह्यातली अनेक मुलं पुण्यात शिक्षणासाठी आहेत. त्यांना आई- बाबा पुण्यात पाऊस पडला का म्हणून विचारतात. कारण याच पावसावर सर्वांचे भवितव्य आहे. या जिल्ह्याचे पर्जन्यमान कमी असलं तरी या जिल्ह्यात साखर कारखाने जास्त आहेत. याचं कारण या जिल्ह्यातील उजनी धरण! हे धरण माढा तालुक्‍यात येते. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या भीमा नदीवर हे धरण बांधलं आहे. याची क्षमता आहे 121 टीएमसी पाणीसाठ्याची आहे. या धरणाने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे व नागरिकांचे नशीब पालटले. एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुष्काळी जिल्ह्यात देशातले सर्वाधिक कारखाने उभे राहिले. पण हे धरण माढा तालुक्‍याच्या हद्दीत कसं आलं याची माहिती अनेकांना नाही. 

हेही वाचा : मोठी बातमी ! लॉकडाउन काळातही 150 जण लाचलुचपतच्या जाळ्यात; पुणे विभाग अव्वल
उजनी धरणाने सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील काही गावांचा कायापालट केला. यात सर्वाधिक क्षेत्र हे करमाळा तालुक्‍यातील गेले आहे. धरण होण्यापूर्वी येथील बरीच शेती पाण्याअभावी मोकळी होती. काम नसल्याने गावातली बहुतांश कुटुंब स्थलांतरित होत होती. जून 1980 ला हे उजनी धरण पूर्ण झालं. उजनीचं पाणी आलं आणि गाव झपाट्याने बदलला. हा बदल केवळ यशवंतराव चव्हाणांच्या कल्पकतेमुळे झाला. शरद पवारांनी या धरणाला मूर्त स्वरूप दिलं. या भागातील विजेचा प्रश्‍न सोडवला. फक्त धरण बांधून चालणार नव्हतं तर साठलेलं पाणी शेतकऱ्यांच्या रानात पोचवण्याचं काम महत्त्वाचं होतं. त्याची जबाबदारी शरद पवार यांनी व्यवस्थितरीत्या पार पाडली. या भागात विजेचा प्रश्‍न गंभीर होता. तो प्रश्‍न पवारांनी सोडवला. फक्त शेतीच नाही तर उद्योग धंदेसुद्धा वाढायला पाहिजेत ही दृष्टी ठेवून पवारांनी शेती, उद्योगधंदे व नागरिकांना पिण्यासाठी असे पाण्याचे नियोजन केले. भीमा-सीना जोडकालवा हा देशातील पहिला नदीजोड प्रकल्प. सीना-माढा उपसा सिंचन योजनेस सरकारने मान्यता दिली. फक्त ऊसच नाही तर बोर, डाळिंब, द्राक्ष, कांदा या पिकांचेही उत्पादन उजनीच्या पाण्यावर सोलापूरचे शेतकरी घेत आहेत. यामुळे उजनी धरण हे सोलापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारं धरण बनलं आहे. हे धरण सोलापुरात पाऊस नाही झाला तरी पुण्याच्या पावसाने भरते. सोलापूरकरांच्या दृष्टीने पंढरपूरच्या विठोबा इतकंच उजनी धरण दैवत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या दूरदृष्टीने आणि शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्या जिद्दीने हे साकारण्यात आलेलं हे धरण आहे. 

हेही वाचा : जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
राज्य सरकारचा कृषिरत्न पुरस्कार मिळालेले आनंद कोठडिया म्हणाले, या धरणाचा जास्तीत जास्त नागरिकांना उपयोग व्हावा म्हणून (कै.) नामदेवराव जगताप यांच्या प्रयत्नाने जागा बदलण्यात आली. या धरणाची जागा पारेवाडीजवळ निश्‍चित झाली होती. मात्र, माढा तालुका, सोलापूर व त्याखालील भागालाही पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून धरणाची जागा बदलण्यात आली. हा भाग पूर्णतः दुष्काळी होती. शेतीशिवाय दुसरा काहीच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. धरण होणार अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा कोणाला खरं वाटत नव्हतं. या भागात तेव्हा पुरेशी जागृती नव्हती. त्यामुळे धरण होणार यावर कोणाचाही विश्‍वास बसला नाही. मात्र, जेव्हा धरणाचे उद्‌घाटन झाले. तेव्हा काही तरी होणार अशी आशा वाटू लागली. त्यानंतर प्रत्यक्ष अधिग्रहण सुरू झाले आणि धरणाचे काम सुरू झाले. या धरणात करमाळा तालुक्‍याचे सर्वाधिक क्षेत्र गेले आहे. या धरणाने पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वैभव मिळवून दिले हे खरं असलं तरी या भागातील पुनर्वसनाचा प्रश्‍न अजून कायम आहे. धरणासाठी जमिनीचे अधिग्रहण सुरू होते. तेव्हा एकल कुटुंबपद्धत अस्तित्वात होती. त्यामुळे खूप कमी कुटुंबांना याचा लाभ झाला. एका घरात चार भाऊ राहत असले तरी त्यात नाव मात्र एकाचेच गेले. त्यामुळे हवा तसा लाभ मिळाला नाही. त्यासाठी अजूनही लढा सुरूच आहे.
या भागातील शेतकरी नानासाहेब सांळुके म्हणाले, पारेवाडीजवळ धरण झाले असते. तर करमाळा तालुक्यातील गावे कमी गेली असती. आणि पुणे जिल्ह्याच्याला जास्त उपयोग झाला आसता. आता करमाळ्याची २१ गावे गेली. पण या पाण्याचा उपयोग सोलापूर जिल्ह्यातील जास्त गावांना झाला. असं असलं तरी उजनी धरण होऊन ४० वर्ष झाली पण आजही पाहिजे तसा फायदा करमाळा तालुक्याला झाला नाही. धरण झाले तेव्हा शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध झालं नाही. पुरेशा दाबाने विज मिळाली नाही. त्यामुळे पाणी असून सुद्धा उपयोग होऊ शकला नाही. यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर जमीनी विकायची सुद्धा वेळ आली. नंतर भांडवल तयार झाले काहींनी बँकाच्या माध्यमातून भांडवल उभारले काही राष्ट्रीयकृत बँका या भागात आल्या. सुरुवातीच्या काळात पाणी उचलण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. मात्र शरद पवार यांनी यात लक्ष घातले आणि पाणी परवानगी मिळू लागली. त्यानंतर धरण भागात विहीरी खोदल्या जाऊ लागले. धरणाच्या शेजारचा भाग समृद्‌ध होण्याआगोदर ज्यांना कॅनेलचे पाणी मिळाले ता भाग समृद्ध झाला. आजून सुद्धा दहीगाव योजना सोडली तर उजनी बॅकवॉटरपासून पाच किलोमीटरपर्यंत सुद्धा पाणी पोचलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com