संस्थानकालीन इमारती अक्कलकोटचे भूषण ! वास्तूंचे संवर्धन झाल्यास ठरतील पर्यटकांचे आकर्षण

Akt Hisorical
Akt Hisorical
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोटमध्ये संस्थानकालीन अनेक महत्त्वाच्या वास्तू, इतिहासाचा साक्षीदार ठरलेले राजवाडे व अनेक महत्त्वपूर्ण इमारती संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. या वास्तूंचे संरक्षण होणे, या इमारतींची जपणूक होणे व वैभवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती होणे ही काळाची गरज आहे. 

संस्थानच्या मालकीच्या असलेल्या तसेच काही वास्तू नगरपरिषदकडे हस्तांतरित झालेल्या आहेत. पण या सर्व वास्तूंचा पर्यटनासाठी वापर होणे आवश्‍यक आहे. 
अक्कलकोट नगरपरिषद ताब्यात असलेले सेंट्रल स्कूल बिल्डिंग, प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल, तारामाता उद्यान कारंजा या गोष्टींकडे सध्या होत असलेले दुर्लक्ष थांबवून त्यांचे संवर्धन करावे व स्वामीभक्तांना या भव्य वास्तूंबद्दलची माहिती मिळणे आवश्‍यक आहे. 

सध्या अक्कलकोट संस्थानची धुरा अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे हे वाहत आहेत. नगरपरिषदेच्या सहकार्याने जुना राजवाडा व इतर सर्व ऐतिहासिक वास्तूंचे पर्यटकांना योग्य दर्शन होईल, अशी व्यवस्था होणे आवश्‍यक आहे. त्या वास्तूंबद्दलचा इतिहास पर्यटकांना जाणून घेता येईल, असे फलक या ठिकाणी लावण्याची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. येथील पडझड व अतिक्रमणे रोखणेही आवश्‍यक आहे. 

दुर्बीण बुरूज 
अक्कलकोट संस्थानच्या मालकीच्या जुन्या राजवाड्याच्या परिसरात असलेले दुर्बीण बुरूज हा पाहणी करण्यासाठी उभा केला आहे. त्याकाळी राजे हे त्यावर जाऊन दुर्बिणीद्वारे निरीक्षण करत. या ठिकाणी खुर्चीवर बसून आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण करणे तसेच दूरवरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवून पाहणी करण्यासाठी या बुरुजाची निर्मिती केली आहे. येथील दुर्बिणी सर्व दिशांना फिरवण्याची देखील सोय होती, असे याबाबत माहिती असलेले दत्तात्रय मंगरुळे यांनी स्पष्ट केले. आता हा दुर्बीण बुरूज पावसाळ्यात झालेल्या मोठ्या पावसात ढासळला आहे. आता तो पडलेला भाग दुरुस्त करून पूर्ववत व्हावा आणि ऐतिहासिक ठेवा जपला जावा, अशी इच्छा इतिहास प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी दुर्बिणीची व्यवस्था केल्यास त्याचा वापर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करणे शक्‍य आहे. 

सेंट्रल स्कूल इमारत 
अक्कलकोट शहराचा त्या वेळी मध्यभागी असणारा भाग म्हणून तूप चौक परिसर. त्याच्या थोडे पुढे गावातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सेंट्रल स्कूल सुरू करण्यात आले. पुढे ही शाळा नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली. त्याच ठिकाणी आणखी एक शाळा तसेच त्याच्यासमोरच आणखी एक इमारतीत दोन शाळा, अशा एकूण शाळा क्रमांक एक ते चार सुरू झाल्या होत्या. पण या दगडी आकर्षक इमारतीच्या आत भरणारी शाळा कोरोना काळात बंद ठेवली गेली आणि त्यानंतर अद्यापही ती बंदच आहे. पण या इमारतीच्या बाबतीतील नगरपरिषदेची संवेदनशीलता आणि ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची त्यांची भूमिकाही हरवत चालल्याचे दिसून येत आहे. सध्या कोट्यवधी रुपये खर्च करूनही अशी इमारत उभी राहू शकत नाही. पण आता त्या इमारतीत झाडे उगवली आहेत. सर्वत्र अस्वच्छता आहे. 

कारंजा चौकातील तारामाता उद्यान 
अक्कलकोट संस्थानच्या महाराणी तारामाता यांनी आपल्या लौकिकास साजेशी कामे केली. त्यांनी अनेक लोककल्याणकारी कामे केल्याचे ज्येष्ठ नागरिक आवर्जून सांगतात. सांगवी जलाशय, तिथला वीज प्रश्न, पॉवर हाउस, जनरेटरची सोय, पाणीपुरवठा योजना, दिवाबत्तीची सोय आदी कामे वाखाणण्याजोगी आहे. त्याकाळी जनता आनंदी आणि सुखी होती. त्या काळात हे उद्यान उभारले. येथे खास इंग्लंडहून कारंजे मागवून बसविले. आशिया खंडात असे तीनच तर भारतात एकूण दोनच कारंजे होते. ते विद्युत रोषणाईसह सुरूही होते. हे उद्यान पोलिस ठाण्यासमोर असून देखील त्यातील एक मासा चोरीला गेला असून, त्याचा तपास अजूनही लागला नाही. असे दुर्मिळ कारंजे असलेले हे उद्यान ओस पडले आहे. 

प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल 
एवन चौकात राजघराण्यातील वारसा सांगणारी पण सध्या नगरपरिषद ताब्यात असूनही दुर्लक्षित असलेली पण अगदी दिमाखात उभी असलेली इमारत म्हणजे प्रमिलाराजे गर्ल्स स्कूलची इमारत. संस्थानकाळात राजकन्येच्या विवाहाप्रसंगी प्रमुख मान्यवरांना उतरण्यासाठी ही इमारत बांधली गेली होती. त्यानंतर प्रमिलाराजे यांच्या शिक्षणाची तसेच शहरातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण म्हणून या शाळेची सुरवात या इमारतीत केली. आता या शाळेच्या परिसरात नगरपरिषद व्यापारी गाळे बांधत असून, त्याचा परिसर अस्वच्छ आहे. शाळेच्या पाठीमागे पडझड झाली असून या ठिकाणी अवैध धंदे देखील सुरू आहेत. 

जेव्हा राजे अक्कलकोटला येतात... 
अक्कलकोट संस्थनची सध्या धुरा वाहत असलेले अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे हे सतत अक्कलकोट येथे येत असतात. त्यांनी आता अनेक सुधारणा घडविण्यासाठी काम सुरू केले आहे. जेव्हा राजे अक्कलकोट येथे येतात तेव्हा नवीन राजवाड्याच्या वर ध्वज उभारला जातो आणि रात्री त्या शेजारी विजेचा दिवा लावला जातो. तेव्हा शहरवासीयांना माहिती होते की, राजे अक्कलकोटला आले आहेत. 

अक्कलकोट शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन होऊ शकते. ऐतिहासिक बागा आणि संस्थानकालीन इमारती यांची देखभाल व दुरुस्ती नगरपरिषदेने हाती घ्यावी. या वास्तूंमुळे शहराच्या वैभवात भर पडेल. 
- डॉ. अरुण यशवंत परिचारक, 
अक्कलकोट 

अक्कलकोटमधील संस्थानकालीन इमारती बांधकाम शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहेत. या ऐतिहासिक वास्तू नवीन पिढीने याची देही याची डोळा पाहाव्यात यासाठी त्यांच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. 
- समीर मनियार, 
पक्षी व निसर्गमित्र, अक्कलकोट 

संस्थानकालीन अनेक गोष्टींचा मंगरुळे परिवार सक्षीदार आहे. आता होत असलेली पडझड व दुर्लक्ष पाहवत नाही. संस्थानकालीन इतारती या नव्या पिढीला दिशादर्शक व माहिती देणाऱ्या असाव्यात असे वाटते. अक्कलकोट संस्थान आणि नगरपरिषद यांनी पुढाकार घेऊन पडझड दुरुस्त करावी. 
- दत्तात्रय मंगरुळे, 
ज्येष्ठ नागरिक, अक्कलकोट 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com