esakal | "आरटीपीसीआर'साठी चार दिवस वेटिंग ! राज्यातील 523 लॅब रात्रंदिवस सुरूच

बोलून बातमी शोधा

RTPCR
"आरटीपीसीआर'साठी चार दिवस वेटिंग ! राज्यातील 523 लॅब रात्रंदिवस सुरूच
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कडक संचारबंदीनंतर काही आस्थापनांना सवलत देण्यात आली. त्या ठिकाणच्या सर्वच कर्मचाऱ्यांना, वाहनचालक, होम डिलिव्हरी देणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. ई- पास मिळविण्यासाठीही टेस्ट केल्याचे मागील 48 तासांतील सर्टिफिकेट आवश्‍यक आहे. त्यामुळे टेस्टिंगसाठी दररोज 60 हजारांहून अधिक जण पुढे येत असून, दररोज राज्यात दोन लाखांहून अधिकजणांची टेस्ट केली जात आहे. त्यामुळे रिपोर्ट येण्यास चार दिवस वाट पाहावी लागत आहे.

राज्यात कडक संचारबंदी लागू केल्यानंतर रिक्षा, एसटी बस, मालवाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. तर होम डिलिव्हरीसाठी ज्यांना ई- पास हवा आहे, परराज्यात जाताना पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे मागील 48 तासांतील कोरोना टेस्ट केल्याचा रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. विवाह समारंभ करण्यापूर्वी संबंधित मंगल कार्यालयात सेवा देणाऱ्यांनाही कोरोना टेस्टची सक्‍ती करण्यात आली आहे. राज्यात एकूण 523 टेस्टिंग लॅब असून त्या ठिकाणी रिपोर्टसाठी गर्दी प्रचंड झाली आहे. त्यामुळे रिपोर्टसाठी किमान 24 तास ते चार दिवसांची वाट पाहावी लागत असल्याची स्थिती सोलापूर, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, ठाणे, मुंबई यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते.

हेही वाचा: जिल्हाधिकारी अन्‌ पोलिस आयुक्‍तांची सतर्कता ! "सिव्हिल'मधील अनेक रुग्णांचे वाचले प्राण

आता मुंबई, ठाण्यातील रुग्णसंख्या कमी होत असतानाच ग्रामीणमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्या ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण वाढविले आहे. सोलापूर शहरातील अश्‍विनी सहकारी रुग्णालयातील लॅबमध्ये शहर, अक्‍कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापुरातील तर सर्वोपचार रुग्णालयातील लॅबमध्ये माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, सांगोला, माढा, बार्शी येथील रुग्णांचे सॅम्पल घेऊन त्यांचा रिपोर्ट तयार केला जातो. त्या ठिकाणी देखील दररोज मोठ्या प्रमाणावर सॅम्पल येत असल्याने रिपोर्टसाठी विलंब लागत असल्याचे संबंधितांनी सांगितले.

ई-पास, सवलतीसाठी टेस्ट सक्‍तीची

आरटीपीसीआर टेस्ट करून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून कडक संचारबंदीत ज्यांना सवलती दिल्या आहेत, त्या ठिकाणचे अधिकारी, कर्मचारी टेस्ट करून घेत आहेत. त्यामुळे लॅबमध्ये टेस्टिंगसाठी गर्दी वाढत असल्याने रिपोर्टसाठी विलंब लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

- श्रीरंग घोलप, संचालक, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई

हेही वाचा: "जनआरोग्य'ची स्थिती : सोलापुरातील रुग्णसंख्या सात हजार 905 अन्‌ मृत्यू 441; तरीही लाभ 664 रुग्णांनाच! 

ठळक बाबी...

  • राज्यातील 523 टेस्टिंग लॅबमध्ये सुरू आहे तीन शिफ्टमध्ये 24 तास काम

  • पाच ते सहा टप्प्यांतून तयार होतो आरटीपीसीआर टेस्टचा अंतिम रिपोर्ट; सवलत असलेल्यांना टेस्ट बंधनकारक

  • मुंबई, पुणे, ठाण्यासह अन्य जिल्ह्यांतील उद्योगांमधील कामगारांचे रिपोर्ट चार दिवस होऊनही येईनात

  • सोलापुरातील दोन्ही टेस्टिंग लॅबचे काम रात्रंदिवस; दररोज सुमारे तीन हजार जणांचे तयार होतात रिपोर्ट

  • मृतांच्या स्वॅबची सीबी-नॅटद्वारे तपासणी; रिपोर्टसाठी लागतो दोन ते अडीच तासांचा अवधी