esakal | जिल्हाधिकारी अन्‌ पोलिस आयुक्‍तांची सतर्कता ! "सिव्हिल'मधील अनेक रुग्णांचे वाचले प्राण

बोलून बातमी शोधा

Collector_CP

जिल्हाधिकारी अन्‌ पोलिस आयुक्‍तांची सतर्कता ! "सिव्हिल'मधील अनेक रुग्णांचे वाचले प्राण

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात सध्या 12 हजारांवर ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यासाठी दररोज 41 ते 42 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची गरज आहे. मात्र, जिल्ह्याला चाकण व हैदराबादवरून 36 मेट्रिक टनापर्यंतच ऑक्‍सिजन येतो. मंगळवारी (ता. 20) सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्‍सिजन कमी पडणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना समजले. त्या वेळी पोलिस आयुक्‍तांनी त्यांच्या हॉस्पिटलसाठी आणलेले 20 तर इतर ठिकाणाहून 80 ऑक्‍सिजनचे सिलिंडर काही वेळातच उपलब्ध करून दिल्याने तेथील रुग्णांचे प्राण वाचले.

सोलापूर शहरातील जवळपास 50 रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत. दररोज ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन व ऑक्‍सिजनची गरजही वाढू लागली आहे. संपूर्ण राज्यातच ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ज्या रुग्णालयांकडे ऑक्‍सिजन शिल्लक आहे, त्यांच्याकडून अन्य रुग्णालयांना भागवाभागवी सुरू आहे.

हेही वाचा: "आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगाच फिरू नका !'

मंगळवारी असाच एक प्रसंग अनुभवायला मिळाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्‍सिजन कमी पडत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांना समजली. त्या वेळी त्यांनी तत्काळ पोलिस आयुक्‍तांना कॉल केला. त्या वेळी शहर पोलिसांसाठी उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेतील 100 बेडच्या कोव्हिड हॉस्पिटलसाठी आणलेले ऑक्‍सिजन सिलिंडर देऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे पाहायला मिळाले. त्या रुग्णालयाचा प्रारंभ बुधवारी (ता. 21) होणार होता. मात्र, अगोदर त्या रुग्णांचा जीव वाचला पाहिजे, ही भूमिका पोलिस आयुक्‍तांनी घेतली. सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्‍तांचे आभार मानले.

पहाटे चार वाजता आला ऑक्‍सिजनचा टॅंकर

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सध्या 310 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी बहुतेक रुग्ण मध्यम, तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेलेच आहेत. दररोज त्या रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची मोठी गरज आहे. मंगळवारी (ता. 20) रात्री साडेनऊनंतर रुग्णांना ऑक्‍सिजन कमी पडेल, असे सिव्हिल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. त्या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उत्तर सोलापूरचे प्रातांधिकारी हेमंत निकम यांनी रात्री 12 वाजता त्यांना ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. त्यानंतर उस्मानाबादवरून येणाऱ्या ऑक्‍सिजन टॅंकरला विनाअडथळा सोलापुरात येण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून मदत केली. पहाटे चार वाजता ऑक्‍सिजनचा टॅंकर सोलापुरात पोचला आणि सिव्हिल हॉस्टिपल प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.

हेही वाचा: सोलापूरला लागतोय दररोज 41 मे.टन ऑक्‍सिजन! 11328 रुग्ण; आरोग्य सुविधा व्हेंटिलेटरवर

पोलिस कोव्हिड हॉस्पिटलचा प्रारंभ लांबणीवर

जनतेच्या सुरक्षिततेसाठी शहर- ग्रामीण पोलिस रस्त्यांवर उतरून रात्रंदिवस सुरक्षा देत आहेत. आतापर्यंत शहर- जिल्ह्यातील दहा पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असा प्रसंग पुन्हा पोलिसांवर ओढावू नये म्हणून पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी पोलिस पब्लिक स्कूलच्या बिल्डिंगमध्ये शंभर बेडचे कोव्हिड हॉस्पिटल पोलिस वेल्फेअर फंडातून उभारले आहे. त्याचे उद्‌घाटन आता अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु, ऑक्‍सिजन सिलिंडर दिल्याने आता त्या रुग्णालयाचा प्रारंभ दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.