esakal | बार्शी तालुक्‍यातील जवळगाव प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल!
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शी तालुक्‍यातील जवळगाव प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल!

गेल्या चार-पाच दिवसांपासून वैराग भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी चित्रा नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.

बार्शी तालुक्‍यातील जवळगाव प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैराग (सोलापूर) : गेल्या चार-पाच दिवसांपासून वैराग (Vairag) भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी चित्रा नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. तर जवळगाव मध्यम प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. तसेच हिंगणी प्रकल्प देखील 62 टक्के भरला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. बार्शी तालुक्‍यात (Barshi Taluka) सर्वात मोठा हिंगणी मध्यम प्रकल्प असून त्याचबरोबर जवळगाव, ढाळे पिंपळगाव प्रकल्पाचा वैराग व परिसरातील शेतीला मोठा फायदा होतो.

हेही वाचा: 'उजनी' @ 70.43 % ! पाणीसाठ्यात होतेय वाढ; शेतकऱ्यांमधून समाधान

नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प सध्या 81 टक्के भरला आहे. प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता 1233.10 द. ल. घ. फूट असून, मृत पाणीसाठा 202.30 द.ल.घ. फूट, उपयुक्त पाणीसाठा 1030.80 द. ल. घ. फूट, कालव्याखालील क्षेत्र - 5341 हेक्‍टर तर पाणलोट क्षेत्र 223 चौरस किलोमीटर आहे.

चित्रा नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे वैराग भागातील ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प 100 टक्के, हिंगणी 62 टक्के तर जवळगाव धरण 81 टक्के पाण्याने भरले असून आज मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी 1023 द.ल.घ. फूट पाणीसाठा आहे. तसेच वैराग - लाडोळे तलाव 66 टक्के भरला आहे. यामुळे वैराग शहराचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गतवर्षी जवळगाव मध्यम प्रकल्प 28 सप्टेंबर 2020 ला 100 टक्के भरला होता, आताही एक- दोन मोठ्या पावसात पूर्ण भरण्याची शक्‍यता आहे. जवळगाव धरणातील पाण्याचा कालव्याद्वारे हत्तीज, हिंगणी, खुंटेवाडी, धामणगाव, राळेरास, दहिटणे, सासुरे, कौठाळी, शेळगाव देगाव, वाळूज या गावांना लाभ होतो. तर धरणातील पाण्याचा उपसा सिंचनाद्वारे अंबाबाईची वाडी, जवळगाव, ज्योतिबाची वाडी, रुई, आंबेगाव, भालगाव, मिर्झनपूर, कासारी, भांडेगाव, सारोळे, चिंचखोपन ही गावे लाभ घेतात. बार्शी, तुळजापूर, मोहोळ तालुक्‍यातील मिळून अशी एकूण सुमारे 24 गावे धरणातील पाण्याचा लाभ घेतात.

हेही वाचा: वीर धरणातून नीरा नदीत 23 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

हिंगणी, जवळगाव, ढाळे पिंपळगाव या तिन्ही धरणांमुळे गेल्या काही वर्षांपासून परिसरात बागायती क्षेत्रात उसाबरोबर द्राक्ष व इतर फळबागांमध्ये वाढ झाली आहे. धरण क्षेत्र परिसरात सलग दोन वर्षे समाधानकारक पाऊस पडला आहे. 13 सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र चालू झाला असून यामध्ये मोठे पाऊस असतात. त्यामुळे यंदाही तिन्ही धरणे भरून वाहतील, अशी शेतकरी वर्गात आशा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्‍चित सुटणार आहे.

बातमीदार : बलभीम लोखंडे

loading image
go to top