
आसरा समांतर उड्डाणपुलासाठी अतिक्रमणावर फिरविला जेसीबी
सोलापूर - आसरा चौक ते डी मार्ट या मार्गावर समांतर रेल्वे उड्डाणपूल होणार आहे. या मार्गावर झालेले अतिक्रमण महापालिकेने जेसीबी लावून हटविले. दोन दुकाने, चार घरांच्या संरक्षक भिंती, गाळे, दुकानांसमोरील कट्टे अशा २० जागांवर जेसीबी फिरवून रस्ता मोकळा करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.
विजयपूर रोड व होटगी रोडला जोडणाऱ्या आसरा चौकात समांतर उड्डाणपूल केला जात आहे. सध्याच्या उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी होते. महापालिका आणि रेल्वेने या ठिकाणी समांतर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उड्डाणपुलाच्या आराखड्यासाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी रेल्वेकडे १८ लाख रुपये वर्ग केले. यानंतर नगररचना आणि अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई हाती घेतली.
आसरा चौक ते डी-मार्ट हा २४ मीटरचा डीपी रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी मिळकतदारांना नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमण स्वत:हून काढण्याचे आवाहन केले होते. आसरा चौकात सिग्नलशेजारी असलेले दोन गाळे पाडण्यात आले. त्याच बाजूला एका दुकानाची संरक्षक भिंत, दोन घरांच्या संरक्षक भिंती, एका मिळकतदाराने रस्त्यावर बांधलेले दुकान पाडण्यात आले. रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्किंगसाठी जागा म्हणून पेव्हर ब्लॉक टाकले होते. हे पेव्हर ब्लॉक उखडून काढले. उड्डाणपुलाच्या उताराला डी मार्टच्या बाजूची अतिक्रमणे दोन दिवसांत हटविणार आहोत, असेही महापालिका नगररचना विभागाकडून सांगण्यात आले.
Web Title: Jcb On Encroachment For Asara Parallel Flyover
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..