esakal | श्‍वानांचे लसीकरण आवश्‍यकच ! जाणून घ्या "रेबीज'ची लक्षणे व घ्यावयाची दक्षता
sakal

बोलून बातमी शोधा

Rabies

श्‍वानांचे लसीकरण आवश्‍यकच! जाणून घ्या "रेबीज'ची लक्षणे व घ्यावयाची दक्षता

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

श्‍वानांचे लसीकरण, भटक्‍या कुत्र्यांचे निर्बिजीकरण याद्वारे या रेबीज आजाराचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो.

सोलापूर : पाळीव कुत्र्यांसोबतच भटक्‍या कुत्र्यांच्या माध्यमातूून रेबीज (Rabies) हा जीवघेणा आजार माणसाला होऊ शकतो. कुत्र्यांचे (श्‍वानांचे) लसीकरण (Vaccination of dogs), भटक्‍या कुत्र्यांचे निर्बिजीकरण (Sterilization of dogs) याद्वारे या आजाराचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या उपायांबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. रेबीज हा प्राण्यांपासून मानवाला होणारा आजार आहे. या आजाराची लक्षणे एकदा माणसात दिसली की तो आजार बरा न होता मानवी मृत्यूस कारणीभूत ठरतो. त्यामुळे या आजारापासून सावध राहणे गरजेचे असते. संसर्गित प्राण्याने चावा घेतल्यास हा आजार होतो. सर्वसाधारणपणे कुत्र्यांच्या चाव्यापासून हा आजार होतो. कुत्र्याने मांजराला चावा घेतला तर मांजरापासून होतो. पण कुत्र्याने मांजराला चावा घेतल्यास भीतीनेच मांजराचा मृत्यू होतो, म्हणून मांजरापासून हा आजाराचा संसर्ग होण्याची शक्‍यता कमी आहे. (Know the symptoms of rabies and precautions to take)

हेही वाचा: कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी

लसीकरणाचा उपाय हा प्रतिबंधक आहे. पाळीव कुत्री पाळणाऱ्या व्यक्तीने कुत्र्याचे पिल्लू लहान असतानाच त्याचे लसीकरण केले पाहिजे. कारण, पाळीव कुत्र्यांपासून सर्वाधिक धोका कुत्री पाळणाऱ्या कुटुंबाला होऊ शकतो. भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण शक्‍य नसले तरी निर्बिजीकरण हा उपाय आहे. भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढली तर या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यावर नियंत्रण मिळवणे देखील अशक्‍य होते.

ठळक बाबी

  • रेबीज आजाराचा धोका कुत्री पाळणाऱ्या कुटुंबाला सर्वाधिक

  • पाळीव कुत्र्याचे संपूर्ण लसीकरण आवश्‍यक

  • चाळीस टक्के संसर्ग लहान मुलांना होण्याची भीती

  • भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढल्यास रेबीज प्रसाराची अधिक शक्‍यता

हेही वाचा: वेड्या बहिणीची वेडी माया ! बहिणीने भावाला किडनीदान करून दिले जीवदान

काय काळजी घ्यावी?

  • लहान मुलांना कुत्र्याचे पिल्लू आणण्याची सवय असते, तेव्हा कुत्री पिल्लाच्या संरक्षणासाठी चावा घेते. त्यामुळे मुलांना पिल्लाजवळ जाऊ देऊ नये

  • पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास तातडीने जखम हलक्‍या डिसइन्फेक्‍टंटने न घासता सहजपणे धुवावी व दवाखान्यात लस घेण्यासाठी जावे

  • लसीचे डोस पूर्ण करावेत; कारण वर्षभरात रेबीजचे विषाणू लक्षणे दाखवतात. लक्षणे दिसली तर त्यावर कोणताही उपाय नाही

  • पाळीव कुत्र्याचे नियमित वार्षिक लसीकरण करणे आवश्‍यक आहे

  • कुत्र्याचा दात लागला तर घाबरण्याचे कारण नाही. केवळ कुत्र्यामध्ये रेबीजची काही लक्षणे आहेत का यावर लक्ष ठेवावे

भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्याची गरज आहे. सोलापुरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आजाराचा संसर्ग झाला तर त्याचा वेगाने प्रसार होण्याची भीती असते. याबाबत या प्राण्यांची संख्या कमी ठेवणे आवश्‍यक आहे.

- डॉ. राकेश चित्तोडा, पशुवैद्यकीय अधिकारी, ऍनिमल राहत, सोलापूर

पाळीव कुत्री पाळणाऱ्या कुटुंबांनी पिल्लू तीन महिन्यांचे असताना रेबीज आजाराची लस दिली पाहिजे. त्यानंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोस द्यावा. यासोबत नियमित वार्षिक लसीकरण करण्याची गरज आहे. अनेक देश रेबीजमुक्त झाले आहेत. ही संधी आपल्या देशाला देखील आहे. त्याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे.

- डॉ. बबन कांबळे, पशुवैद्यकीय व्यावसायिक, सोलापूर

loading image