esakal | वेड्या बहिणीची वेडी माया ! बहिणीने भावाला किडनीदान करून दिले जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

Sangola

वेड्या बहिणीची वेडी माया ! बहिणीने भावाला किडनीदान करून दिले जीवदान

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

आपल्या भावाला जीवनाचा आधार देणाऱ्या बहिणीची माया दाखवणारी घटना सांगोला तालुक्‍यातील वासूद-अकोला येथे घडली आहे.

सांगोला (सोलापूर) : जीवन देणारी असते आई, पण जीवनाचा आधार असते ताई. याप्रमाणेच आपल्या भावाला जीवनाचा आधार देणाऱ्या बहिणीची माया दाखवणारी घटना सांगोला तालुक्‍यातील वासूद-अकोला येथे घडली आहे. आपल्या आजारी भावासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःची किडनी दान (Kidney donation) करून भावाचे प्राण वाचवणाऱ्या बहिणीची वेडी माया दिसून आली. (A sister from Sangola taluka donated a kidney to her brother)

हेही वाचा: कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी

सांगोल्याचे डाळिंब व्यापारी व वासूद गावचे रहिवासी असणारे विष्णुपंत दगडू केदार हे सर्वसामान्य कुटुंबातील. विष्णुपंत यांना तीन भाऊ व एक बहीण, आई, वडील असे कुटुंब. लहानपणी लवकरच पडलेल्या जबाबदारीमुळे जिद्द, परिश्रम व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर सांगोला तालुक्‍यामध्ये अल्पावधीतच डाळिंब व्यापार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. परंतु, हे सर्व करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत गेले. सुरवातीला मधुमेह व उच्च रक्तदाब या व्याधींनी त्यांना ग्रासले. तरीही न डगमगता त्यांनी वेळोवेळी औषधोपचार, पथ्य, व्यायाम, संतुलित आहार यांचे पालन करून आजारांवर नियंत्रण ठेवले होते. 17 वर्षांपासून ते नियमित औषधोपचार, तपासणी, पथ्य यांचे काटेकोरपणे पालन करत होते. परंतु, नियतीला काही हे मान्य नव्हतं.

हेही वाचा: पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन ! कोरोनामुळे विद्यापीठाचा निर्णय

संसाराचा गाडा हाकताना झालेली परवड, सुरवातीच्या काळामध्ये आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे वर्षभरापूर्वीपासून त्यांना आरोग्याविषयी समस्या जाणवू लागल्या. त्यातच विष्णुपंत यांना किडनी विकाराचे निदान झाले. त्यामध्ये त्यांना किडनी फेल असल्याचं डॉक्‍टरांनी सांगितलं व किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. किडनी फेल याचा अर्थ सारखं डायलिसिस करावे लागणार, दुसरी किडनी कुठून भेटणार, भेटली तर मॅच होईल का नाही याची भीती, आधीचे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार. या सर्व प्रश्‍नांमुळे त्यांच्या व कुटुंबीयांच्या मनामध्ये भीतीने काहूर माजवले होते. पण प्रबळ इच्छाशक्ती, जिद्दी स्वभाव यांच्या जोरावर खचून न जाता त्यांनी वेळोवेळी डायलिसिस, औषधउपचार चालू ठेवले आणि किडनी डोनर कोणी भेटतोय का याचा शोध सुरू ठेवला. कुटुंबामधील पत्नी, भाऊ, बहीण अशा सर्वांनी विष्णुपंत यांना किडनी दान करण्याची तयारी दर्शवली. किडनी दाते असताना देखील विष्णुपंत यांचा रक्तगट व त्या रक्तगटाची किडनी मिळणे, ती मॅच होणं हा प्रॉब्लेम येत होता.

अखेर सर्व रक्त व रक्तगट संदर्भातील सर्व प्रकारच्या प्राथमिक तपासण्या झाल्या व त्यांच्या सख्ख्या बहिणीची किडनी मॅच झाली. विष्णुपंत यांची बहीण म्हणजेच माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे यांच्या वहिनी शारदा शिंदे. त्यांनी लगेचच तयार होत आपल्या लाडक्‍या भावासाठी वयाच्या 54 व्या वर्षी किडनी दान करण्याचा संकल्प केला. या संकल्पाला त्यांचे पती नानासाहेब शिंदे, दीर अशोक शिंदे व कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. अखेर 14 जून रोजी अत्यंत धैर्याने अनेक संकटांना सामोरे जात पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विष्णुपंत यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. दोघा बहीण- भावाची तब्येत देखील चांगली आहे.

भाऊ-बहीण नात्याचा एक नवा आदर्श

सध्याच्या स्वार्थी जगामध्ये बहिणीने आपल्या भावासाठी किडनी दान करून जीवदान दिले आणि बहीण-भाऊ हे नातं म्हणण्यापुरतंच न ठेवता या नात्यामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम केलंय. बहीण-भावाच्या नात्यांमधील गोडवा अबाधित राखण्याचं काम विष्णुपंत केदार व शारदा शिंदे यांनी केलं आहे. तसेच समाजापुढे भाऊ-बहीण नात्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

loading image