esakal | सोलापूरच्या विकासाच्या वाटा मृगजळच ठरणार का? विमानतळ, बुलेट ट्रेनबाबत दुजाभाव
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूरच्या विकासाच्या वाटा मृगजळच ठरणार का? विमानतळ, बुलेट ट्रेनबाबत दुजाभाव

सोलापुरातून विमान उड्डाण झाले तर आणि तरच सोलापूर विकासाच्या दिशेने झेपावेल; अन्यथा सोलापूरसाठी विकास मृगजळच ठरणार आहे.

Solapur : विकासाच्या वाटा मृगजळच ठरणार का?

sakal_logo
By
अभय दिवाणजी

सोलापूर : दळणवळणाच्या सर्व सुविधा असलेल्या सोलापूरच्या (Solapur) विकासाची कवाडं केवळ विमानसेवेअभावी (Airlines) खुली होण्यास अवधी लागत असल्याचे कारण नेहमीच पुढे येते. दरम्यान, बोरामणी येथील सोलापूर विमानतळाच्या (Airport) भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. बुलेट ट्रेनचा (Bullet Train) मार्ग वळविण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू झाला आहे. सोलापुरातून विमान उड्डाण झाले तर आणि तरच सोलापूर विकासाच्या दिशेने झेपावेल; अन्यथा सोलापूरसाठी विकास मृगजळच ठरणार आहे. शेजारच्या कलबुर्गीहून (Kalburgi) विमानांचे उड्डाण सुरू आहे. विजयपूरचे (Vijaypur) काम अंतिम टप्प्यात आहे. तर सिंधुदुर्ग (चिप्पी) (Sindhudurg) येथील विमानतळाचे 9 ऑक्‍टोबर रोजी उद्‌घाटन होत आहे. मग सोलापूरचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आता जनरेट्यात वाढ होण्याची गरज निर्माण झाली आहे.

बोरामणी, तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात 575 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली. वन विभागाकडे असलेल्या केवळ 33.72 हेक्‍टर जमीन भूसंपादनाचा विषय राहिला होता. 2009 पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू होती. आता वन विभागाच्या प्रादेशिक अधिकार समितीने हा प्रस्ताव धुडकावून लावला. एका माळढोकच्या संगोपनासाठी पर्यावरणदृष्ट्या हा भूभाग देणे अशक्‍य असल्याचे समितीचे म्हणणे आहे. यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी राज्य व केंद्राकडे पुनर्विचार प्रस्ताव पाठविणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यांनी प्रस्ताव पाठविला आहे.

बोरामणी येथील विमानतळाच्या संपादित जागेबाबतची अडचण झाली आहे. पुनर्विचार प्रस्तावाबाबतच्या निर्णयावर या जागेचे भवितव्य ठरणार असून, त्याला आता किती कालावधी लागेल याचा नेम नाही. या 575 हेक्‍टर संपादित जागेवर विमानतळ झाले नाही तर पुढे काय? या जागेचा वापर कशासाठी करायचा? मूळ उद्देशच सफल झाला नाही तर काय? सोलापूरसाठी विमानतळ मंजूर आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने जागा पाहायची काय? ती कुठे असावी? पुन्हा इतके मोठे भूसंपादन अन्‌ तेही नव्या दराप्रमाणे शक्‍य होईल काय? विद्यमान लोकप्रतिनिधींनी या प्रश्‍नात लक्ष घातले तर केंद्राकडून काही मदत मिळेल काय? हे सारे प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. हे सारे होईल तेव्हा होईल, पण सध्या तरी केवळ विमानसेवेअभावी विकासाला निश्‍चितच मर्यादा आल्या आहेत. 2014 मध्ये "उडान' योजनेत समावेश झालेल्या सोलापूरसाठी मार्च 2023 पर्यंतची मुदत आहे. आगामी दीड वर्षात या योजनेचा लाभ घ्यावा लागेल.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार! 'ही' आहेत कारणे

सोलापूरमार्गे मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गाचे सर्वेक्षण झाले. आता मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ही ट्रेन नांदेडमार्गे वळविण्यासाठी विनंती केली आहे. असा प्रकार होणार नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. पण एकूणच काय तर सोलापूरच्या विकासासाठी पुन्हा ताकदीचा लोकप्रतिनिधीच नसल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले जात आहे. सध्यातरी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामींनी हा प्रश्‍न लावून धरला आहे.

होटगी रस्त्यावरील विमानतळ सुरू होण्यात सर्वात मोठा अडथळा सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनच्या चिमणीचा आहे. महापालिका आणि डीजीसीएने परवानगी दिलेली नसतानाही ही चिमणी उभारण्यात आल्याने ती बेकायदेशीर आहे. दोनवेळा चिमणी पाडकामासाठी निविदा प्रक्रियाही झाली. सध्या चिमणी पाडण्याचा विषय विधी व न्याय खात्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. हा अभिप्राय आता तरी लवकर येईल. सध्या चिमणी उभारण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर करून नवी चिमणी उभी करता येईल. यातून विमान उड्डाणास अडथळा येणार नाही, असे वाटते.

हेही वाचा: बोरामणी विमानतळप्रश्‍नी 'चेम्बर'चे शरद पवारांना साकडे!

सोलापूर विमानतळ (बोरामणी)

  • डिसेंबर 2008 मध्ये योजना जाहीर

  • 2009 पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू

  • एकूण संपादित क्षेत्र : 575 हेक्‍टर

  • निर्वनीकरणाचा फेटाळलेला प्रस्ताव : 33.73 हेक्‍टर

होटगी रोड

  • 1953 - भूसंपादन प्रक्रिया

  • 1983-84 - प्रत्यक्ष काम पूर्ण

  • एकूण जागा : 146 हेक्‍टर (रेकॉर्डनुसार), 112 हेक्‍टर (प्रत्यक्षात ताबा)

  • रन वे : 2100 मीटर

  • सध्या वापरात : 842 मीटर

  • इमारत सुशोभिकरण खर्च : 50 कोटी

विमान उड्डाण गरजेचेच

प्रवाशांबरोबरच विविध औद्योगिक तसेच कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी विमानसेवेची मोठी गरज आहे. ती नव्या मोठ्या विमानतळाशिवाय अशक्‍य आहे. एकतर होटगी रोड विमानतळाचा विस्तार करावा लागेल किंवा नवे विमानतळ उभे करावे लागेल. बोरामणी येथील विमातळाच्या उभारणीचे स्वप्न आता पुनर्विचार प्रस्तावानंतरच पूर्ण होईल, यात शंका नाही. सध्यातरी होटगी रोडवरील विमानतळावरून विमानाचे उड्डाण होणे गरजेचे बनले आहे. विमानसेवा सुरू झाली तरच सोलापूरचे चक्र (स्पिन ऑफ इफेक्‍ट) फिरेल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे म्हणणे आहे.

नेत्यांच्या विमानसेवेवर तब्बल दोन कोटींचा खर्च

केवळ व्हीआयपींच्या सोयीसाठी उपयोगात येणाऱ्या होटगी रोडवरील विमानतळावरून सेवा बंद असली तरी हे विमानतळ चालू ठेवण्यासाठी केंद्र शासन वर्षाकाठी तब्बल दोन कोटींहून अधिक खर्च करत आहे. वीजबिल, विमानसेवेसाठी असलेले तांत्रिक, इंटरनल वायरलेस सिस्टिम, इंटरनेट, कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच देखभाल- दुरुस्तीवर वर्षाकाठी तब्बल दोन कोटींचा खर्च होतो. विमानसेवा बंद मात्र कोट्यवधींच्या खर्चाचे मीटर चालू आहे.

loading image
go to top