ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांचा गंडा! तोडणी मुकादम नॉट रिचेबल | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांचा गंडा! तोडणी मुकादम नॉट रिचेबल
ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांचा गंडा! तोडणी मुकादम नॉट रिचेबल

ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांचा गंडा! तोडणी मुकादम नॉट रिचेबल

चिखलठाण (सोलापूर) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहेत. पण करमाळा (Karmala) तालुक्‍यातील अनेक वाहन मालकांच्या तोडणी मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत. इतर जिल्ह्यांतील तोडणी मुकादमांनी वाहन मालकांना लाखो रुपयांचा गंडा घालून ते नॉट रिचेबल झाले आहेत. यात तालुक्‍यातील शंभरपेक्षा जास्त वाहन मालकांचे प्रत्येकी दहा ते बारा लाख रुपये बुडाल्यात जमा आहेत. यामुळे वाहन मालकांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा: 'शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळिराजा जिंकला!'

आपला स्वतःचा ऊस वेळेवर कारखान्याकडे गाळपास जावा, शेतीला जोडधंदा असावा म्हणून अनेक शेतकरी ट्रॅक्‍टर व ट्रकसारखी वाहने खरेदी करून या वाहन व्यवसायात उतरले आहेत. वाहनांसाठी आपली शेतजमीन गहाण ठेवून लाखो रुपयांचे बॅंका व फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढली आहेत. ऊस तोडणीसाठी नगर, बीड, जालना, यवतमाळ, परभणी जिल्ह्यातील व मध्य प्रदेशातील तोडणी मुकादमांना दहा ते बारा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उचल देऊन साखर कारखान्यांबरोबर तोडणी वाहतूक करार केले आहेत. अनेकांनी या व्यवसायासाठी 30 ते 35 लाख रुपये भांडवल गुंतवणूक केली आहे. मात्र, साखर कारखाने सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला तरी अनेक वाहन मालकांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्याच आल्या नाहीत. त्यात मुकादम नॉट रिचेबल झाल्याने मालकांची चिंता वाढली आहे. सध्या या शेतकऱ्यांची वाहने दारात धूळखात पडली असून यामुळे वाहन मालकांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

मी परभणी जिल्ह्यातील गावातील तोडणी मुकादमाला जून महिन्यात सात लाख रुपये दिले. टोळी आणायला जाताना तीन लाख रुपये उचल दहा मजूर जोड्यांसाठी देणार होतो. ऑक्‍टोबर महिन्यात त्यांना ऊस तोडणीसाठी वाहन घेऊन आणायला गेलो. निघताना मुकदमाला फोन केला तेव्हापासून त्यांनी फोन बंद करून ठेवला आहे. त्या गावातून तो गायब आहे. तिथे चार दिवस थांबून रिकाम्या हाताने परत आलो.

- शहाजी जाधव, वाहन मालक, शेटफळ, ता. करमाळा

हेही वाचा: सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची CBI च्या संयुक्त संचालकपदी निवड

साखर कारखाने वाहन मालक शेतकऱ्यांना दोन ते चार लाख रुपये उचल देतात. त्यांची टोळी हजर झाली नाही तर उसाच्या बिलातून किंवा तोडणी बिलातून ही रक्कम वसूल करतात. पण तो वाहन मालक तोडणी मुकादमांकडून आपण दिलेली रक्कम वसूल करू शकत नाही. हे मुकादम एकापेक्षा जास्त वाहन मालकांकडून पैसे घेतात व गावातून गायब होतात. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या कुटुंबातील इतर लोक वाहन मालकांच्या नावे पळवून नेल्याची केस स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करतात.

- नितीन तकीक, वाहन मालक, वांगी, ता. करमाळा

loading image
go to top