सोलापुरात ‘कल्याण’च्या मटक्यात लाखोंची उलाढाल? पोलिस कारवाईनंतरही बंद नाही जुगार

शहरात फ्रूट बिअरची अवैध विक्री, हातभट्टीची विक्री व वाहतूक, मटका, क्लब, गुटखा व मावा विक्री बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र आहे. ‘कल्याण’च्या मटक्याची दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा असून, त्यावर कोणाचाही ‘अंकुश’ राहिला नाही, अशी स्थिती आहे.
Crime News
Crime Newsesakal

सोलापूर : शहरात फ्रूट बिअरची अवैध विक्री, हातभट्टीची विक्री व वाहतूक, मटका, क्लब, गुटखा व मावा विक्री बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र आहे. शहर पोलिसांकडून कधी कधी कारवाई होत असतानाही त्यातील कोणताच अवैध प्रकार पूर्णत: बंद झालेला नाही, हे विशेष. ‘कल्याण’च्या मटक्याची दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा असून, त्यावर कोणाचाही ‘अंकुश’ राहिला नाही, अशी स्थिती आहे.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्याच पैशांवर अंक तथा अंदाजित आकड्यावर पैज लावून ‘कल्याण’चा मटका शहरात बिनधास्तपणे खेळला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी पोलिस कारवाईत संबधितांवर गुन्हे दाखल केले जातात. परंतु, तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी मटका खेळणाऱ्यांची लाइनच शोधून काढली होती. त्यावेळी मटक्यात वर्षाकाठी कोट्यवधींचा टर्नओव्हर होत असल्याची बाब देखील समोर आली होती. अनेक तरुण त्याच्या आहारी जात आहेत. दरम्यान, आता शहरातील काही चहा कॅंटीनच्या बाजूला, पान शॉपजवळ, लक्ष्मी मार्केट परिसरात, काही हॉस्पिटल्सच्या बोळात, आयटीआय बस स्टॉपजवळ, काही वाईन शॉपजवळ तर काही ठिकाणी हॉटेलच्या बोळात ‘कल्याण’चा मटका खेळला जात असल्याची बाब पोलिसांच्या कारवाईतून दिसून येते.

अवैध व्यवसायाला खतपाणी नकोच

शहरात सात पोलिस ठाणी असून त्याअंतर्गत जवळपास दोन हजार ९२ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. शहराचा विस्तार, लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चितच मनुष्यबळ कमी आहे. परंतु, कारवाईत सातत्य राहिल्यास निश्चितपणे ‘यशस्वी ऑपरेशन परिवर्तन’ होऊ शकते, असा सर्वसामान्यांना विश्वास आहे. शहर गुन्हे शाखा, सात पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथके कार्यरत आहेत. अनेक गुन्ह्यांचा तपास व गुन्हेगारांच्या शोधाच्या निमित्ताने पोलिसांचे जागोजागी खबरी आहेत. तरीदेखील शहरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोचत नाही कशी, हा प्रश्न सोलापूरकरांच्या मनात आहे. गुन्हेगारी वाढण्यातील प्रमुख कारणांमध्ये अवैध व्यवसाय हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी अवैध धंद्यांना वेळीच लगाम घालणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ज्ञ सांगतात.

मटक्यातील संशयित ‘राकेश’ आहे कोण?

शहर पोलिसांनी ज्या ज्यावेळी मटक्यावर कारवाई केली, त्यात राकेश कोरे या संशयिताचे हमखास नाव असतेच. शुक्रवारी (ता. ६) सदर बझार, जेलरोड, फौजदार चावडी, विजापूर नाका व जोडभावी पेठ पोलिसांनी आठ ठिकाणी मटक्यावर कारवाई करीत १८ जणांवर गुन्हे नोंदवले. त्यात जेलरोड पोलिसांच्या तीन ठिकाणच्या कारवाईत राकेश कोरे याचे नाव कॉमन आहे. विशेष म्हणजे १५ संशयित कुठे राहतात, त्याची नोंद फिर्यादीत आहे. पण, राकेश कोरे कोण, कुठे राहतो, यासंदर्भात फिर्यादीत काहीच नमूद नाही. अनेक महिन्यांपासून त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असतानाही त्याचा पत्ता पोलिसांना माहिती होत नाही, ही बाब सर्वसामान्यांना खटकत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com