
जिल्ह्यात दरमहा ८५ कोटींची मद्यविक्री! ढाब्यांवर मद्यपान कराल तर दाखल होईल आता थेट गुन्हा
सोलापूर : ढाब्यांवर विनापरवाना मद्यपान करणे गुन्हा असून संबंधितावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९अंतर्गत कलम ६८ व ८४ नुसार गुन्हा दाखल होतो. त्यानंतर त्या मद्यपींना अटक केले जाते. न्यायालयाकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. दंड न भरल्यास कारावास देखील होतो. त्यामुळे अनेकांचे करिअर बरबाद होऊ शकते.
सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस मद्यविक्रीत मोठी वाढ होऊ लागली आहे. अनेकांनी मद्यपान करण्याचा परवाना घेतला आहे, पण बहुतेकजण विनापरवानाच दारू पितात ही वस्तुस्थिती आहे. आता त्या मद्यपींसह अवैधरीत्या दारू विकणाऱ्या धाबा चालकांवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा पाश आवळला आहे. १ ते २९ मे दरम्यान जिल्ह्यातील दहा धाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना हॉटेल चालकासह मद्यपींना सव्वातीन लाखांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.
कारवाईसाठी सोलापूर अ व ब विभाग आणि पंढरपूर, माळशिरस असे चार विभाग आहेत. प्रत्येक विभागाअंतर्गत एक वरिष्ठ निरीक्षक व दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन जवान व एक चालक अशी टीम आहे. त्याचबरोबर जिल्ह्यासाठी एक भरारी पथक असून नांदणी चेकपोस्टवर देखील अवैध दारू वाहतुकीवर कारवाई केली जाते. सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रामुख्याने ढाब्यांवर कारवाई केली जात आहे.
इथे करता येईल परवान्यासाठी अर्ज
मद्यपानाचा परवाना घेण्यासाठी पहिल्यांदा https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून नोंदणी करावी लागते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑनलाइन सर्व्हिसेस’वरून परवान्यासाठी माहिती भरून अर्ज करता येतो. त्यानंतर संबंधितास परवाना मिळतो. वार्षिक परवान्यासाठी १०० रुपये तर आजीवन परवान्यासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागते. परवाना आहे म्हणून कोठेही मद्यपान करता येत नाही. त्यांना परमीट रुम किंवा त्यांच्या घरीच मद्यपानास परवानगी आहे.
जिल्ह्यात दरमहा २५ लाख लिटर मद्यविक्री
जिल्ह्यातील बिअरशॉपीमधून दरमहा सरासरी साडेपाच लाख लिटरपर्यंत बिअरची विक्री होते. दुसरीकडे वाईनॉप व देशी दारूच्या दुकानांमधून साडेसात लाख लिटर आणि विदेशी दारूची सहा लाख लिटर दारूची विक्री होते. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात दरमहा ऑनरेकार्ड ८५ कोटी रुपयांची मद्यविक्री होते. दुसरीकडे हातभट्ट्यांवर तयार होणारी अवैध दारू देखील लाखो लिटर असून विनापरवाना चोरीच्या मार्गाने देखील मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होते ही वस्तुस्थिती आहे.
परवाना असला तरी कोठेही मद्यपान करता येणार नाही
जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर गरजेनुसार स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. विनापरवाना मद्यपान करणे गुन्हा आहे, पण परवाना असलेल्यांना ढाब्यांवर मद्यपान करता येत नाही. परवानाधारकांना केवळ त्यांच्या घरी किंवा परमीट रूममध्येच मद्यपान करता येते.
- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर
जिल्ह्यातील मद्यविक्री करणारी दुकाने
बिअरशॉपी : २७०
वाईनशॉप : ४०
परमीट रुम : ५५०
देशी दारु : ११५