उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) सोमवारी (ता. 15) पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची (Vitthal-Rukmini) शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते करण्यात आली. दर्शन रांगेतील कोंडीबा देवराव टोणगे (Kondiba Tonage) (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे (Prayagbai Tonage) (वय 55, राहणार मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जिल्हा नांदेड) या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. शेतकरी असलेले हे दाम्पत्य गेली तीस वर्षे सलग पंढरीच्या वारीसाठी येत आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. पवार तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या टोणगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne), आमदार समाधान आवताडे (Samadhan Awtade) आदी उपस्थित होते.

हेही वाचा: श्री विठ्ठल-रुक्‍मिणीला महापूजेसाठी बनारसी पोशाख

पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली. सत्काराप्रसंगी प्रारंभी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांत अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच सदस्य उपस्थित होते.

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीला आकर्षक पोषाख

कार्तिकी एकादशी पूजेच्या वेळी विठुरायाला निळ्या रंगाचा बनारसी अंगरखा, पितांबर, शेला तर श्री रुक्‍मिणी मातेला हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसवण्यात आली. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्‍मिणीतेचे रूप अधिकच खुलून दिसू लागले.

वारकरी प्रतिनिधीचा मान नांदेड जिल्ह्याला

कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेच्या वेळी दर्शनाच्या रांगेतील एका दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत महापूजा करण्याचा मान दिला जातो. परंतु गेल्या वीस महिन्यांपासून कोरोनाच्या सावटामुळे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद होते. त्यामुळे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरातील वीणेकरी लोकांमधून चिठ्ठी टाकून त्या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान देण्यात येत होता. यंदा यात्रा भरली असल्याने दर्शनाच्या रांगेतील कोंडीबा देवराव टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे (वय 55, राहणार मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जिल्हा नांदेड) या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. शेतकरी असलेले हे दाम्पत्य 1991 पासून सलग तीस वर्षे पंढरीच्या वारीसाठी येत आहे.

हेही वाचा: कार्तिकी वारी : दर्शनरांगेतील दाम्पत्याला यंदा महापूजेची संधी

पाच टन फुलांनी सजावट...

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पुणे येथील श्री विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली होती. आजच्या सजावटीसाठी झेंडू, आष्टर, शेवंती, जरबेरा, गुलाब, कामिनी, गुलछडी, तगर अशा विविध प्रकारच्या सुमारे पाच टन रंगीबेरंगी आकर्षक फुलांचा वापर करण्यात आला. मंदिरात सभामंडप, सोळखांबी, 'श्रीं'चा गाभारा, श्री रुक्‍मिणी मातेचा गाभारा, श्री रुक्‍मिणी माता सभामंडप, मंदिरातील परिवार देवता अशा सर्व ठिकाणी फुलांनी सजावट करण्यात आलेली असल्याने जिकडे पाहावे तिकडे फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळत आहे. श्री. जांभुळकर हे गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी फुलांची सजावट करत आहेत. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यंदा यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

loading image
go to top