Maratha Reservation : सकल मराठा समाजाचा आमदारांच्या घरासमोर ठिय्या ; आरक्षणासाठी तातडीने कायदा करण्याची मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीनही आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांचा गैरसमज झाल्याने मराठा आंदोलक जनवात्सल्य समोर आक्रमक झाले होते.
Maratha Reservation
Maratha Reservationsakal

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीनही आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांचा गैरसमज झाल्याने मराठा आंदोलक जनवात्सल्य समोर आक्रमक झाले होते. प्रणिती शिंदे यांचा गैरसमज दूरध्वनीद्वारे दूर केल्यानंतर ही घोषणाबाजी थांबवून निवेदन देण्यात आले.

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या २० फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्या अधिवेशनात सर्वच आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकमुखी मागणी करावी, यासाठी राज्यभर मराठा समाज प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीत आहे.

सोलापुरात तीन आमदारांपैकी विजयकुमार देशमुख हे आपल्या निवासस्थानी होते तर आमदार सुभाष देशमुख हे दिल्लीमध्ये आहेत आणि आमदार प्रणिती शिंदे या मुंबईत त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनाला गेल्याने त्या भेटू शकल्या नाहीत. या दोन्ही आमदारांच्या स्वीय सहायकांनी निवेदने स्वीकारली. सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांच्या कार्यालयातून मराठा बांधवांनी एकत्रित येऊन रेल्वे लाइन परिसरातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.

Maratha Reservation
Solapur Zillaparishad : गुणवंत कर्मचाऱ्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने यावेळी मराठा बांधवांनी सरकारने तातडीने उपोषणस्थळी जाऊन त्यांचे उपोषण सोडवावे, अशी आग्रही मागणी केली. आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाहेर येऊन मराठा बांधवांचे निवेदन स्वीकारले. यावेळी संबोधित करताना देशमुख यांनी मी कायमच मराठा समाजाच्या सोबत आहे, तुमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल, सरकार त्यासाठी प्रयत्न करीत आहे. येणाऱ्या अधिवेशनात मी सुद्धा निश्चित आरक्षण देण्याची आग्रही मागणी करेन, असे आश्वासन दिले.

जनवासल्यसमोर आंदोलक आक्रमक

आमदार प्रणिती शिंदे यांचा गैरसमज झाल्याने मराठा आंदोलक जनवात्सल्यसमोर आक्रमक झाले होते. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव हे सात रस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आले. यावेळी त्या ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी करण्यात आली. आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्याने त्यांना फोन लावण्यात आला. परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आले नाही, त्यांचा गैरसमज झाला.

त्यांनी फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तिथे का गेले नाहीत, असा प्रश्न केला असता मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला, त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरवात केली. हा गोंधळ बराच वेळ चालला शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आले. त्यानंतर आमदार शिंदे यांनी येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चित आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बंटी चंदनशिवे यांच्याकडे निवेदन देऊन तिथून रवाना झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com