शेतकऱ्यांनो, लष्करी अळीचा धोका वेळीच ओळखा ! मकेवरील अळीचे "असे' करा व्यवस्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लष्करी अळीचा धोका वेळीच ओळखा! मकेवरील अळीचे असे करा व्यवस्थापन

ही अळी मका पिकाबरोबरच भात, ज्वारी, ऊस, भाजीपाला, कपाशी व अन्य पिकांवर उपजीविका करते.

लष्करी अळीचा धोका वेळीच ओळखा! मकेवरील अळीचे असे करा व्यवस्थापन

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : अमेरिकन लष्करी अळी (American military larvae) ही मूळची अमेरिकेसारख्या ऊष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील कीड (Insects) 2018 पासून भारतात आढळत आहे. ही अळी मका पिकाबरोबरच भात, ज्वारी, ऊस, भाजीपाला, कपाशी व अन्य पिकांवर उपजीविका करते. मका पिकातून अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यावर प्रादुर्भाव करणाऱ्या या अमेरिकन लष्करी अळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. (Measures to control the outbreak of military larvae on maize crop)

हेही वाचा: बेड न मिळाल्याने कोरोना ड्यूटीवरील शिक्षकाच्या आईचा मृत्यू !

या अळीच्या अंडी, अळी, कोष, पतंग अशा चार अवस्था असून साधारण 60 दिवसांत तिचा एक जीवनक्रम संपतो. यातील अळी अवस्था पिकांचे नुकसान करते. ही अळी तपकिरी रंगाची असून पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते व नंतर छिद्रे दिसतात. मकेच्या पोग्यात शिरून ही अळी कोवळी पाने खाते. त्यामुळे पाने कुरतडल्यासारखी दिसतात व पोग्यात विष्ठा आढळते. मकेस कणसे लागल्यानंतर अळी त्याभोवतालची कोवळी पाने व कोवळे दाणे खाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

हेही वाचा: "उजनी'तून सोडले सोलापूरसाठी पाणी ! 3600 क्‍युसेक विसर्ग

असे करावे लष्करी अळीचे व्यवस्थापन

 • मका पिकात तूर, मूग, उडीद अशी आंतरपिके घ्यावीत. ती या किडीस बळी पडत नाहीत. या पिकांमुळे मित्रकीटकांची संख्या वाढते

 • सापळा पीक म्हणून नेपिअर गवत लावावे. त्यावर कीड दिसताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी

 • पिकांची फेरपालट करावी. उदा : मका पिकानंतर सूर्यफूल, भुईमूग घेणे

 • मशागतीय पद्धत- खोल नांगरट करावी. जेणेकरून जमिनीतील किडीचे कोष उघडे पडून पक्षी त्यांना खातील

 • पेरणीपूर्वी बियाणास सायंट्रानिलीप्रोल (19.8 टक्के) + थायोमिथॉक्‍झाम (19.8 टक्के) कीटकनाशकांची 4 ग्रॅम/किलो लावून बीजप्रक्रिया करावी

 • लष्करी अळीसाठी कामगंध सापळा एकरी पाचप्रमाणे लावावेत. सापळ्यातील पतंग गोळा करून नष्ट करावेत

 • शेतात एकरी 10 पक्षीथांबे उभे करावेत

 • परभक्षी व परोपजीवी कीटक उदा : लेडी बर्ड बिटल, मुंगळे, पक्षी, गांधीलमाशी यांचे प्रमाण वाढेल असे नियोजन करावे.

 • जैविक कीडनाशके-मेटारायझिअम एनिसोपली, मेटाऱ्हायशिअम रिलाई, बिव्हेरिया बॅसियाना या कीडनाशकांची 5 ग्रॅम/लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी

प्रादुर्भाव 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची पाण्यातून फवारणी करावी

 • थायोमिथॉक्‍झाम (12.6 टक्के) + लॅमडा सायहॉलोथ्रीन (9.5 टक्के) 0.5 मिली/लिटर

 • स्पिनोटोरम (11.7 टक्के) 0.5 मिली/लिटर

 • क्‍लोरअँट्रानिलीप्रोल (18.5 टक्के) 0.4 मिली/लिटर

 • इमामेक्‍टिन बेंझोएट 0.5 ग्रॅम/लिटर

जिल्ह्यातील मकेचे लष्करी अळीचे बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) वर्ष (क्षेत्र)

 • 2018-18 (1130)

 • 2019-20 (4512)

 • 2020-21 (788)

सोलापूर जिल्ह्यातील मकेचे सरासरी क्षेत्र 61 हजार 113 हेक्‍टर आहे. शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक व कीड व्यवस्थापन केल्यास त्यांना मकेचे जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल.

- गजानन ननवरे, तालुका कृषी अधिकारी, माळशिरस

loading image
go to top