बेड न मिळाल्याने कोरोना ड्यूटीवरील शिक्षकाच्या आईचा मृत्यू ! कुटुंबातील नऊ सदस्य बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोना काळात विविध कामांवर असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बेड न मिळाल्याने कोरोना ड्यूटीवरील शिक्षकाच्या आईचा मृत्यू !

sakal_logo
By
अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : कोरोना (Covid-19) काळात वेळापूर (ता. माळशिरस) ग्रामपंचायतमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या (Corona preventive vaccination) ऑनलाइन, ऑफलाइन नोंदीच्या कामावर असताना स्वतः कोरोना बाधित झालेल्या माध्यमिक शिक्षकाच्या आईचा कोरोनाने बळी घेतल्याची घटना वेळापूर येथे घडली. वेळापूर इंग्लिश स्कूल येथील माध्यमिक शिक्षक भास्कर किसन बागल यांच्या मातोश्री राधा किसन बागल (वय 75, रा. उघडेवाडी, ता. माळशिरस) यांचे पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. (The mother of the teacher on corona duty died due to not getting a oxygen bed)

हेही वाचा: "उजनी'तून सोडले सोलापूरसाठी पाणी ! 3600 क्‍युसेक विसर्ग

भास्कर बागल हे शिक्षक वरिष्ठांच्या सूचनेनुसार 9 मेपासून वेळापूर ग्रामपंचायतमध्ये लसीकरण नोंदणीच्या कामावर इतर सहा शिक्षकांसमवेत कार्यरत होते. 15 मे रोजी त्यांना ताप आल्याने त्यांनी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी केली असता ते स्वतः कोरोना बाधित झाल्याचे आढळले. त्यांच्या कुटुंबात राहणाऱ्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी केली असता कुटुंबातील तब्बल नऊ सदस्य कोरोना बाधित झाल्याचे धक्कादायक निदान झाले. यामध्येच त्यांच्या वयोवृद्ध मातोश्रीचाही समावेश होता.

हेही वाचा: साडेबारा हजार रेल्वे प्रवाशांनी केले तिकीट रद्द !

बुधवारी (ता. 17) त्यांच्या आईस श्वास घेण्याचा त्रास वाढू लागल्याने अकलूजमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या केल्या असता त्यांना तातडीने ऑक्‍सिजन / व्हेंटिलेटर बेडवर ठेवण्याची सूचना डॉक्‍टरांनी केली. परंतु अकलूज परिसरात बेड उपलब्ध नसल्याने तातडीने त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी (ता. 20) उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यानच्या काळात माळशिरस तालुक्‍याचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने अकलूजमध्ये व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करून ठेवली. परंतु रुग्णास पंढरपूर येथून हलवण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. कोरोना ड्यूटीवर कार्यरत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीला व्हेंटिलेटर बेड न मिळण्याच्या धक्कादायक घटनेने मात्र कोरोना काळात विविध कामांवर असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

loading image
go to top