esakal | एमआयएम नगरसेवक-आमदार संजयमामांची भेट : राष्ट्रवादीसाठी त्यांनी स्विकारला अजितदादांच्या विश्‍वासू चेल्याचा मार्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

एमआयएमच्या नगरसेवकांनी आता करमाळ्याचे अपक्ष आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासून सहकारी संजयमामा शिंदे यांचा मार्ग स्विकारला आहे. यावेळी तौफिक शेख, प्रमोद गायकवाड, अजित बनसोडे, इरफान शेख यांच्यासह एमआयएम नगरसेवक व महिला नगरसेवकांचे पती उपस्थित होते. 

एमआयएम नगरसेवक-आमदार संजयमामांची भेट : राष्ट्रवादीसाठी त्यांनी स्विकारला अजितदादांच्या विश्‍वासू चेल्याचा मार्ग 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असलेल्या एमआयएम नगरसेवकांच्या चर्चा मधल्या काळात बंद झाला.

राष्ट्रवादीत जाण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी आता दुसरा पर्याय निवडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील विश्‍वासू सहकारी म्हणून करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांची ओळख आहे. एमआयएमच्या सात नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. 6) आमदार संजयमामा शिंदे यांची गुप्त भेट घेतली. कुमठे ते सोरेगाव रोडवर असलेल्या विलास लोकरे यांच्या हॉटेल स्वराजमध्ये ही गुप्त भेट झाली.

तब्बल दोन झालेल्या या बैठकीत सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान हे देखील उपस्थित होते. 
सोलापूर ग्रामीण जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरीही सोलापूर शहरात राष्ट्रवादीला कधीच जम बसविता आला नाही. सोलापूर शहरात प्राबल्य असलेल्या लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचा प्रभावी नेता राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादीची ताकद ही मुठभरच राहिली आहे.

सोलापूर शहरातील राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहरावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यातूनच महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह अन्य नगरसेवकांना पक्षात घेण्याचा पर्याय समोर आला आहे. कोठे आणि शेख यांच्या प्रवेशाच्या फक्त चर्चाच झाल्या. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादीला यातून काहीच मिळाले नाही. 

कोठे यांच्या प्रवेशाला महाविकास आघाडी आणि शिवसेनेचा मोठा अडथळा आहे. एमआयएमच्या नगरसेवकांना कसलाही अडथळा नसताना आमचा प्रवेश का होत नाही? असाच प्रश्‍न त्यांना पडला आहे. बारामतीला (राष्ट्रवादीत) जाण्यासाठी आपण निवडलेला मार्ग चुकीचा तर नाही ना? अशी उमज एमआयएमच्या नगरसेवकांना आल्याने त्यांनी आता करमाळ्याचे अपक्ष आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासून सहकारी संजयमामा शिंदे यांचा मार्ग स्विकारला आहे. यावेळी तौफिक शेख, प्रमोद गायकवाड, अजित बनसोडे, इरफान शेख यांच्यासह एमआयएम नगरसेवक व महिला नगरसेवकांचे पती उपस्थित होते. 

आमदार संजयमामा शिंदेच का? 
2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरुन सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर प्रचंड टिका केली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर 2019 च्या निवडणुकीतील माढा लोकसभेचा प्रभावी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने आमदार संजयमामा शिंदे यांनाच पसंती दिली. माढा लोकसभेसाठी भाजपची ऑफर असताना देखील संजयमामा शिंदे यांनी फक्त अजित पवार यांच्या प्रेमापोटी इच्छा नसताना माढ्यातून राष्ट्रवादीतर्फे लोकसभा निवडण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली. अजित पवार आणि संजयमामा शिंदे यांच्या मैत्रीची झलक पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिली. करमाळ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांची उमेदवारी आयत्या वेळी रद्द करुन अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा पुरस्कृत उमेदवार करण्याचा निर्णय अजित पवार यांनीच घेतला. बोरामणी विमानतळाला पन्नास कोटींचा निधी देण्याचा विषय असो सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मी येतोय हा सर्वात पहिला मेसेज असो. या सर्व घटनांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संजयमामा शिंदे यांच्यातील मैत्रीची कल्पना एमएमआयच्या नगरसेवकांना आल्याने त्यांनी आता राष्ट्रवादीत येण्यासाठी करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांचा मार्ग स्विकारल्याचे दिसते. 

विजयसिंह मोहिते-पाटलानंतर संजयमामा शिंदे 
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीत सोलापूर ग्रामीण व शहराची जबाबदारी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने सोपविली होती. सोलापुरातील राष्ट्रवादीपेक्षा मोहिते-पाटील समर्थकांचाच अधिक भरणा झाला होता. मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक राष्ट्रवादीला सोडून गेले. सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस कधीच भक्कम झाली नाही. तत्कालिन पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व दिलीप सोपल यांनाही फारसे यश आले नाही. राजकिय बेरीज करण्यात आणि परफेक्‍ट टायमिंग साधण्यात करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांचा विशेष हातखंडा आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी एकेकाळी संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व केले. सक्रिय राजकारणातून सध्या ते बाजूला असल्याने जिल्हाव्यापी नेतृत्वाची पोकळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात सध्या असलेले नेते त्यांच्या तालुक्‍यापुरते मर्यादित आहेत. प्रशांत परिचारक यांची विधानपरिषद निवडणूक आणि 2017 च्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवड यातून संजयमामा शिंदे यांनी त्यांच्यातील जिल्हा व्यापी नेतृत्वाचा नमुना दाखवून दिला आहे. एमआयएम नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची मोहिम ते कशी फत्ते करतात? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर शहरात लक्ष घालायला सुरुवात केली आहे.

loading image