esakal | शाळा बंदमुळे अल्पवयीन मुलींच्या कपाळी बाशिंग ! शाळाबाह्य मुले अन्‌ बालमजुरी वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा बंदमुळे अल्पवयीन मुलींच्या कपाळी बाशिंग !

कोरोना आजारापेक्षा चिमुकल्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे भयावह वास्तव आता समोर येऊ लागले आहे.

शाळा बंदमुळे अल्पवयीन मुलींच्या कपाळी बाशिंग !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना (Covid-19) आजारापेक्षा चिमुकल्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे भयावह वास्तव आता समोर येऊ लागले आहे. मोबाईल नसल्याने शाळा अन्‌ शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना मजुरीशिवाय पर्याय राहिलेला नाही. दुसरीकडे, ज्या वयात नोकरीचे स्वप्न पाहिले, त्याच वयात मुलींच्या स्वप्नांचा चुराडा होऊन तिच्या कपाळी बाशिंग बांधले जात आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मागील 16 महिन्यांत तब्बल 105 बालविवाह (Child marriage) थांबवले आहेत. दुसरीकडे, गुपचूप विवाह केलेल्यांची संख्याही मोठी आहे.

हेही वाचा: 'उजनी' रेंगाळतेय 60-62 टक्‍क्‍यांवरच! तीन जिल्ह्यांना लागली धाकधूक

कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च 2020 पासून शाळांना लावलेले कुलूप अजूनही उघडलेले नाही. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षक शाळेतून मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत. परंतु, ऑनलाइनसाठी शाळेतील 50 टक्‍केदेखील मुलांची उपस्थिती नसते. ऑनलाइन तास चालू असतानाच मुले इतरांना चॅटिंग करू लागल्याचीही बाब समोर आली आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना पालकांनी मोबाईलपासून चार हात लांबच ठेवले होते. परंतु, ऑनलाइन शिक्षणामुळे त्याच पालकांना मुलांसाठी मोबाईल घेऊन द्यावा लागला आहे. आई-वडील कामावर गेल्यानंतर मुले मोबाईल घेऊन दिवसभर बसतात. त्यामुळे त्यांना डोळ्यांचे विकार, कानाने कमी ऐकू येणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चिमुकल्यांना बालवयात ज्या गोष्टींची माहिती व्हायला नको, त्या बाबींची माहिती मोबाईलवरून मिळू लागली आहे. त्यातून सहावी, सातवीतील मुलींच्या वागणुकीत बदल होत असल्याचे अनुभव बालकल्याण समितीला आले आहेत. ऑनलाइन शिक्षण काळाची गरज आहे, परंतु तो पर्याय अंतिम नाही. फायद्याच्या तुलनेत ऑनलाइनचे तोटेच अधिक प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे ऑफलाइन शाळा सुरू व्हाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यात 2020-21 मध्ये 105 बालविवाह थांबविले आहेत. गुपचूप पद्धतीने विवाह झाल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतु बालविवाहानंतर पुढे त्या अल्पवयीन मुलीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. अल्पवयात आई झालेल्या मुलीसह तिच्या बाळाचीही चिंता असल्याने शाळा सुरू व्हायला हव्यात.

- अनुजा कुलकर्णी, जिल्हाध्यक्षा, बालकल्याण समिती, सोलापूर

हेही वाचा: राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा 'या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल लांबला

शिक्षकांना वेतन, मग मुलांना उपस्थिती भत्ता का नाही?

कोरोना काळात शिक्षकांनी घरोघरी जाऊन को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले रुग्ण) रुग्णांच्या सर्व्हेसह विविध प्रकारची कामे केली. त्यांचे काम कौतुकास्पद असून आता त्यांच्यावर मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. मुलांसाठी ऍन्ड्रॉइड मोबाईल घेऊन देण्याची ज्या मुलांच्या पालकांची परिस्थिती नाही, अशांसाठी शासन स्तरावरून मदतीची अपेक्षा आहे. शाळा बंद असतानाही शिक्षकांना वेतन दिले जाते, परंतु, दररोज एक रुपयाप्रमाणे मिळणारा उपस्थिती भत्ता विद्यार्थ्यांना न देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या सर्व परिस्थितीला वैतागून पालकांनी मुलींचा बालवयातच विवाह लावून देण्याचा सपाटा लावल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्याची स्थिती...

  • एकूण शाळा : 3,942

  • एकूण विद्यार्थी : 5,13,691

  • ऑनलाइन शिक्षणासाठी उपस्थिती : 40 ते 42 टक्‍के

  • शाळाबाह्य मुले : 248

  • बालविवाह : 105

  • अंदाजित बालमजूर : 3000

loading image
go to top