esakal | "चुलते गेल्यानंतर आमच्या कुटुंबीयांनी घेतला कोरोनाचा अनुभव ! वेळीच उपचार हाच रामबाण उपाय'

बोलून बातमी शोधा

MLA Paricharak
"चुलते गेल्यानंतर आमच्या कुटुंबीयांनी घेतला कोरोनाचा अनुभव ! वेळीच उपचार हाच रामबाण उपाय'
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : आमच्या घरी चुलते (कै.) सुधाकरपंत परिचारक आणि वडील असा दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना उपचारासाठी पुण्यात घेऊन गेलो. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पंढरपूला आल्यावर आपल्याला देखील लक्षणे जाणवू लागल्याने आपली तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुढे आपल्यासह कुटुंबातील अनेक सदस्य कोरोनाबाधित झाल्याने सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. त्या काळात कोरोनाचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. प्रत्येकाने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आपापल्या आरोग्याचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याची आपल्या सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अशा परिस्थितीत लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे, असे श्री. परिचारक यांनी नमूद केले.

कोरोनाची लक्षणे दिसताच अंगावर न काढता तातडीने तपासणी केली पाहिजे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास न घाबरता आणि कोणापासूनही न लपवता डॉक्‍टरांकडे जाऊन उपचार घेतले तर आजार बळावत नाही. वेळीच उपचार हाच यातील रामबाण औषध आहे. सकारात्मक दृष्टिकोन, योग्य आहार, नियमित प्राणायाम आणि डॉक्‍टरांनी सांगितलेले व्यायाम याद्वारे रोग प्रतिकारशक्ती वाढवली तर कोरोनावर यशस्वी मात करता येते, असे मत आमदार प्रशांत परिचारक यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा: उपचारासाठी विलंब नकोच ! 30 वर्षांखालील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; आज वाढले 1547 रुग्ण

आमदार परिचारक म्हणाले, कोरोनाला घाबरूनच अनेकांचा त्रास वाढतो आहे. प्रामुख्याने हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. अंगावर न काढता लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्‍टरांकडे जाऊन सल्ला घेतला पाहिजे. कोरोना तपासणी केली तर ती पॉझिटिव्ह येते म्हणून बहुतांश लोक टेस्ट करणे टाळतात आणि मग संसर्ग वाढल्यावर रुग्णाला एकदम त्रास जाणवू लागतो. बऱ्याच वेळा रुग्णाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मग गुंतागुंत वाढते, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेऊन घरी विलगीकरणात राहून देखील शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. परंतु, कोरोनावर मात करून बरे झालेल्या लोकांची सध्या चर्चा फारशी होत नाहीये. सगळीकडे नकारात्मक चित्र उभा केले जात आहे. अशा परिस्थितीतीत "सकाळ'ने कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लोकांची माहिती द्यायला सुरवात केली आहे, ही अतिशय चांगली बाब असल्याचे आमदार श्री. परिचारक यांनी नमूद केले.

हेही वाचा: अक्कलकोट पोलिसांसमोर आव्हान ! सलग दोन दिवस पेट्रोल पंपावर हजारो लिटर डिझेलची चोरी

आमदार परिचारक यांचा सल्ला...

  • लक्षणे दिसताच अंगावर न काढता कोरोना टेस्ट करावी

  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा

  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत

  • जास्तीत जास्त लोकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे

  • सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यायामाचा होतो फायदा

पंढरपूर येथे कोरोना रुग्णांसाठी जादा दोनशे बेडची व्यवस्था करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. ऑक्‍सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी पांडुंरग कारखान्यावर ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आमच्या हालचाली सुरू आहेत. सोलापूर जिल्हा आणि प्रामुख्याने पंढरपूर, मंगळवेढा भागात लसीचा जादा पुरवठा करावा आणि लसीकरण केंद्रे वाढवावीत यासाठी मंत्री आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत.

- प्रशांत परिचारक, आमदार