esakal | मोहिते-पाटलांना धक्का : सात संचालक अपात्र 
sakal

बोलून बातमी शोधा

mohite patil

सोलापूर कार्यालयाची पहिलीच मोठी कारवाई 
सोलापूरला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय सुरू झाल्यानंतर या कार्यालयाची पहिलीच व सर्वांत मोठी ही कारवाई मानली जात आहे. ऊसबिले थकविणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्याची प्रक्रिया या कार्यालयातून राबविली जाते. आता संचालक अपात्र करण्याची मोठी महत्त्वपूर्ण कारवाई या कार्यालयाच्या माध्यमातून झाली आहे. 

मोहिते-पाटलांना धक्का : सात संचालक अपात्र 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील अध्यक्ष असलेल्या शंकर सहकारी साखर कारखान्यातील सात संचालकांना अपात्र करण्यात आले आहे. साखर कारखान्याने केलेल्या उपविधीचा व सहकार कायद्याचा भंग केल्याने सोलापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी ही कारवाई केली आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 
हेही वाचा - मध्यरात्री दीड वाजता घडलेला रुग्णालयातील प्रकार सीसीटीव्हीत 
नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत फोंडशिरस गटातून विजयी झालेले चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर व दत्तू वाघमोडे, इस्लामपूर गटाचे संचालक अमित माने, बोरगाव गटाचे संचालक भगवान मिसाळ व दत्तात्रेय चव्हाण आणि इतर मागासवर्गीय गटाचे संचालक शिवाजी गोरे या सात संचालकांना अपात्र करण्यात आले आहे. शेअर्सच्या प्रमाणात या संचालकांनी शंकर साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत या सात संचालकांच्या उमेदवारी अर्जावर भानुदास सालगुडे-पाटील यांच्यासह इतरांनी त्याच वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे हरकत घेण्यात आली होती. 
निवडणूक निर्णय अधिकारी पाटोळे यांनी ही हरकत फेटाळल्याने तक्रारदारांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. 
हेही वाचा - मुलांच्या शिक्षणासाठी अंधारातही तिची होडी पाण्यात 
उच्च न्यायालयातून हे प्रकरण साखर सहसंचालक कार्यालयात आले. साखर सहसंचालक कार्यालयाने या प्रकरणी संबंधित संचालकांना नोटीस देऊन सुनावणीही घेतली. या सुनावणीनंतर सात संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. माजी सहकार राज्यमंत्री कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर या कारखान्याची धुरा त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आली. नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत या कारखान्यावर विजयसिंह मोहिते-पाटील व रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली.

loading image