
मोहोळचे तत्कालीन आमदार तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश नागनाथ कदम यांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलकावर जामीन मंजूर केला.
MLA Ramesh Kadam : मोहोळचे आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर
मोहोळ - मोहोळचे तत्कालीन आमदार तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश नागनाथ कदम यांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलकावर जामीन मंजूर केल्याने मोहोळ मध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला.
सन 2014 साली मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कडून त्यांनी आमदारकी मिळवली होती. त्यांनी आमदारकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोहोळ शहरासह तालुक्याच्या विकासाकडे लक्ष दिले होते. उड्डाणपूल ते गवत्या मारुती चौकापर्यंत रस्ते दुभाजक बसविले होते. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली होती. 'मागेल त्याला पाणी' व 'मागेल त्याला रस्ता' या त्यांच्या सामाजिक उपक्रमास मतदार संघातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यानी मतदार संघात सुमारे 370 बोअर घेतले आहेत, त्या सर्वांना आज तागायत भरपूर पाणी आहे.
माजी आमदार कदम यांनी मतदार संघात 'एसएमएस' पद्धत राबवली होती. ज्यांच्या घरी विवाह सोहळा व अथवा कुठलाही कार्यक्रम असेल त्याने कदम यांना मोबाईल वर एसएमएस केला तर अर्ध्या तासात त्यांच्या कार्यक्रम स्थळी पाण्याचा टँकर पोहोच होत होता. मतदार संघातील नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी दीड कोटी रुपयाची बोअरची गाडी खरेदी केली होती, तर दहा मोठे टँकर व काही लहान टँकर नागरिकांना उपलब्ध करून दिले होते. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून काही गावातील रखडलेले रस्त्याचे प्रश्न त्यांनी चुटकी सारखे सोडविले आहेत.
दरम्यान अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळया प्रकरणी त्यांना तुरुंगात जावे लागले. तब्बल सात वर्षानंतर त्यांना आज जामीन मिळाला आहे. दरम्यान माजी आमदार कदम यांना अन्य प्रकरणांमध्ये अटक असल्याने त्याना तुरूंगातुन बाहेर येण्यास वेळ लागणार आहे. त्यांना जेलमध्येच थांबावे लागणार आहे. यावेळी अॅड. विनोद कांबळे, दिनेश माने, दिनेश घागरे, बालाजी खंदारे, बाबुराव माळी, संतोष बिराजदार, राजाभाऊ गायकवाड, सुरेश लोखंडे, सुधीर खंदारे, बाळासाहेब जाधव, नागेश खिलारे, श्रीकांत जवंजाळ, किशोर पवार, जयपाल पवार, श्रीरंग गडदे, आदी सह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया -
माजी आमदार रमेश कदम यांना जामीन झाल्याने मोहोळच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ते गेले सात वर्ष तुरुंगात असल्याने मोहोळचा विकास ठप्प झाला होता. त्यांना जामीन झाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे.
- अॅड. विनोद कांबळे, मोहोळ