'कडक उन्हामुळे डाळिंबाच्या फळाला आच्छादन लावण्याच्या कामाला वेग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pomegranate Tree

गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. मोहोळ तालुक्यात सध्या पेरू, डाळिंब या फळबागा उतरण्याच्या प्रक्रियेत आहेत.

Mohol News : 'कडक उन्हामुळे डाळिंबाच्या फळाला आच्छादन लावण्याच्या कामाला वेग'

मोहोळ - गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. मोहोळ तालुक्यात सध्या पेरू, डाळिंब या फळबागा उतरण्याच्या प्रक्रियेत आहेत. मात्र उन्हामुळे डाळिंब, पेरू या फळावर परिणाम होऊ नये यासाठी फळांना प्लॅस्टिक पिशवी व कागदाचे आच्छादन लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यामुळे फळांना संरक्षण तर मिळालेच परंतु महिला व पुरुष मजुरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.

मोहोळ तालुक्यात डाळिंब, पेरू, सिताफळ या फळबागांचे क्षेत्र विस्तारले आहे. उसापेक्षा फळबागांना कमी पाणी लागते, त्यामुळे सर्रास ठिबक सिंचनाचा वापर केला जात आहे. ठिबक सिंचनामुळे फळाच्या झाडाच्या बुडात पडलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी पाचटाचे मल्चिंग केले जात आहे. सूर्यप्रकाश न मिळाल्याने भोदावर निरोपयोगी गवत ही उगवत नाही व पाण्याचे बाष्पीभवन ही होत नाही. यापूर्वी बहार धरलेल्या पेरू व डाळिंब या फळबागेची फळे उतरण्याच्या प्रक्रियेत आहेत.

कडक उन्हामुळे या फळावर चट्टे पडतात, वेळप्रसंगी ती तडकतात. मालाचा दर्जा उत्तम राहावा व बाजारपेठेत चांगल्या दराने माल विकावा यासाठी प्रत्येक झाडावरील फळाला त्याच आकाराची प्लॅस्टिक पिशवी आणून त्यावर आच्छादन केले जाते. जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहेत ते वृत्तपत्राची रद्दी बरोबर फळाच्या आकाराची कापून स्टेपल द्वारा आच्छादन करतात.

दरम्यान एक महिला मजूर दिवसा काठी अडीचशे ते तीनशे रुपये मजुरीत पाचशे ते सहाशे फळांना अच्छादन करते, तर इंदापूर परिसरातील काही मजूर मोहोळ तालुक्यात येऊन "उक्ती" कामे घेऊन एका फळाला 50 पैसे दराने दिवसासाठी चौदाशे ते पंधराशे फळांना अच्छादित करते. त्यामुळे एका महिला मजुराला अथवा पुरुष मजुराला दिवसाकाठी साडेसातशे ते आठशे रुपये मजुरी मिळते.