मोहोळ : चुलीत पाणी ओतणाऱ्यांच्या हातात सत्ता देऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Vitthal Sahakari Sugar Factory

मोहोळ : चुलीत पाणी ओतणाऱ्यांच्या हातात सत्ता देऊ नका

मोहोळ : शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले न देणाऱ्याना मते मागण्याचा अधिकार नाही, कारखाना बंद पाडुन शेतकऱ्यांच्या चुलित पाणी ओतण्याचे काम केलेल्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आघाडी केली असून, उस उत्पादक सभासदांनी लबाडांच्या हाती कारखाना देवू नये असे प्रतिपादन विठ्ठल विकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी केले.

पापरी ता मोहोळ येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणुकीच्या प्रचारार्थ अभिजीत पाटील पापरी येथे आले असता ते सभासदांना मार्गदर्शन करत होते,यावेळी त्यांच्या समवेत उमेदवार,डॉ बी पी रोंगे, शेतकरी संघटनेचे दीपक भोसले आदि उपस्थित होते.

यावेळी पाटील पुढे म्हणाले, कारखाना बन्द असूनही सत्ताधाऱ्यांनी गाड्या, डिझेल वापरणे सुरुच आहे, कारखान्यास उपपदार्थ निर्मीती असतानाही अडचणी का येतात, युवराज पाटील स्वतः 12 वर्ष संचालक होते, सभासदांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

यावेळी डॉ बी पी रोंगे म्हणाले, जे सध्या वारसदार म्हणून मते मागत आहेत ते इतके दिवस कारखाना बन्द पाडणाऱ्या सोबत भागीदार झाले आहेत, त्यांच्या ऊसाची बिले दिल्या शिवाय फॉर्म भरणार नाही ही डरकाळी हवेत विरली असून, विठ्ठल च्या सभासदांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अभिजीत पाटील हे आजारी संस्थाचे डॉक्टर असून कारखाना चालविणारा माणूस आहे,या पूर्वी त्यांनी अनेक बंद पडलेले कारखाने सुरु केले आहेत. कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची मुख्य भूमिका आहे,ही परिवर्तनाची लाट असून सभासदांनी यात सहभागी व्हावे.

यावेळी शेतकरी संघटनेचे दीपक भोसले म्हणाले, कै. औदुंबर (अण्णा) यांनी कारखान्याची उभारणी करून तो चांगला चालवुन शेतकरी,कामगार,वाहतूक दारांचे हित जपले. ज्यांना त्यांनी हे शिकविले त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, कारखान्याच्या पैशावर कै औदुंबर पाटील यांनी कधी राजकारण केले नाही,मात्र सत्ता धाऱ्यांनी उलट केले,ही सर्व लबाडांची टोळी आहे,ही निवडणूक थेट सभासदांच्या चुलीशी निगडित असल्याचे भावनिक अवाहनाला बळी न पड़ता योग्य उमेदवाराला मतदान करावे.यावेळी बहुसंख्य सभासद उपस्थीत होते.