esakal | शिक्षक, पोलिस उपनिरीक्षक ते महापालिका उपायुक्त! धनराज पांडेंची संघर्षमय यशोगाथा
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक, पोलिस उपनिरीक्षक ते महापालिका उपायुक्त! धनराज पांडेंची संघर्षमय यशोगाथा

ही संघर्षमय यशोगाथा आहे सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांची.

शिक्षक, पोलिस उपनिरीक्षक ते महापालिका उपायुक्त! संघर्षमय यशोगाथा

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : 'गरीब म्हणून जन्माला आलात, तर तो तुमचा दोष नाही; पण गरीब म्हणूनच जग सोडून गेलात, तर त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात' या वाक्‍यापासून प्रेरणा घेऊन, घरची हलाखीची परिस्थिती असतानादेखील आपणही अधिकारी व्हायचंच, अशी खूणगाठ मनाशी बांधली. पुण्यात (Pune) स्वतःची राहायची सोय नसतानाही घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे क्‍लासेस घेत स्पर्धा परीक्षेचा (Competitive exam) अभ्यास केला अन्‌ पोलिस उपनिरीक्षकनंतर (Police Sub-Inspector) वित्त व लेखा अधिकारी (Finance and Accounts Officer) या पदाला गवसणी घातली. आज सोलापूर महानगरपालिकेत (Solapur Municipal Corporation) उपायुक्त (Deputy Commissioner) म्हणून कार्यरत आहेत. ही संघर्षमय यशोगाथा आहे धनराज पांडे (Dhanraj Pande) यांची.

हेही वाचा: अधिकाऱ्यांच्या गावातील रँचो, लॉकडाउनमध्ये केले 58 इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट

या यशाबाबत धनराज पांडे म्हणतात, लातूर जिल्ह्यातील तोंडार गाव, तसा दुष्काळी पट्टाच. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. आई-वडील शेतकरी असल्याने मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करून देत असत. आपल्या गावचे, कुटुंबाचे नाव तूच उज्ज्वल करू शकतोस, तुझ्यात तेवढी क्षमता आहे. तू ठरवलंस तर काहीही करू शकतोस, अशी प्रेरणा आई-वडील नेहमी द्यायचे. त्यांच्या असलेल्या अपेक्षा व तळमळ बघून मी अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. शिक्षणात लहानपणापासूनच हुशार असल्याने सातत्याने गुणवत्तेत अव्वलस्थानी कायम राहिलो. चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत शिक्षणासाठी फायदा करून घेतला. दहावी व बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. त्यामुळे इंजिनिअरिंग, मेडिकलला प्रवेश मिळत होता. परंतु ते शिक्षण घेण्याइतकी घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे कमी खर्चात शिक्षण घेऊन तातडीने नोकरी करण्याशिवाय पर्याय नसल्याने व शिक्षक होऊन देखील चांगली समाजसेवा करता येते आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तातडीने निकाली निघू शकतो, या हेतूने शिक्षक होण्याकरिता डीएडला प्रवेश घेतला. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठातुन बीएचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासाच्या जोरावर डीएड चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने, कंत्राटी शिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातील मुरूड-जिंजीराला नोकरी मिळाली. परंतु मनात कुठेतरी स्पर्धा परीक्षा करावी, अशी इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे करता येत नव्हती.

हेही वाचा: उपळाईच्या शेतकऱ्याने नादच केलाय थेट! 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंब

नोकरीच्या निमित्ताने आयुष्यात लातूरहून पुण्याच्या पलीकडे जाण्याचा हा पहिलाच योग होता. शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर सुरवातीला तीन हजार रुपये पगार मिळायचा. त्यात घरखर्च देखील भागत नसायचा. गावाकडे कर्जाचा बोजा वाढत होता. तुटपुंज्या पगारावर भागत नसतानादेखील समाजकार्य करण्याची संधी मिळत असल्याने, पगाराची चिंता न करता येईल तो दिवस काढत, सह्याद्रीच्या कुशीतील डोंगर दऱ्यातील मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित असे की, तेथील अनेक माझ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर मजल मारली.

पुढे अधुनमधून पुण्यात येणे होत असल्याने, साहजिकच स्पर्धा परीक्षेचे आकर्षण वाढू लागले. परंतु पैशाची चणचण भासत असायची. थोडेफार रुपये बचत करून त्यातून पुस्तके खरेदी करून अभ्यास करू लागलो. स्पर्धा परीक्षा मन लावून केली तर काहीच अवघड नाही, हे चांगलेच उमजल्याने, गावाकडे न सांगताच नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यात स्पर्धा परीक्षेसाठी क्‍लास लावला. परंतु पैसे नसल्याने काही दिवसांतच क्‍लासेसला रामराम ठोकला. आर्थिक गणित चांगलेच कोलमडले. हातातील नोकरीही गेली होती. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अनुभव असल्याने, विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन क्‍लासेस सुरू केले. अशाप्रकारे आर्थिक अडचणी दूर होऊ लागल्या. हे सुरू असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील काही विषयांसाठी क्‍लास सुरू केले व स्वतः पोलिस उपनिरीक्षक, इतर स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक व वर्ग ब पदासाठी असलेल्या एका पदासाठी घवघवीत यश संपादन केले. परंतु प्राधान्य हे पोलिस उपअधीक्षक पदासाठी असल्याने पुन्हा प्रयत्न केला. दुसऱ्या परीक्षेत मात्र पोलिस उपअधीक्षक नाही, परंतु वर्ग "अ' या पदासाठी वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवड झाली. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही नोकरी स्वीकारली.

पहिली नियुक्ती पुणे, मुंबई व नंतर सोलापूर येथे या पदावर काम करण्याची संधी मिळाली. सध्या सोलापूर शहरात मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे हाताळून कोरोना नियंत्रण करण्यात मोलाची कामगिरी बजावत असल्याने, प्रशासकीय कामाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन, महापालिका उपायुक्त म्हणून नेमणूक केली आहे.

loading image
go to top