‘पोक्सो’ गुन्ह्यातील २ संशयितांकडून पीडितेच्या घरात घुसून खुनी हल्ला! API, PSI सह चौघे निलंबित

अल्पवयीन पीडितेची तक्रार दाखल करून घ्यायला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवून बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व एका हवालदारासह बार्शी शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकासह एका हवालदारास निलंबित केले.
Police PSI
Police PSIesakal

सोलापूर : अल्पवयीन अत्याचार पीडितेची तक्रार दाखल करून घ्यायला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवून बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व एका हवालदारासह बार्शी शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकासह एका हवालदारास महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निलंबित केले.

बार्शी तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी घरी जात असताना रविवारी (ता. ५) दोघांनी तिच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार केला. पीडितेने त्याच दिवशी पोलिसात फिर्याद दाखल करूनही तपास अधिकाऱ्यांनी संशयितांना अटक केली नाही. तसेच वैद्यकीय तपासणी देखील केली नाही. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणीला बोलावल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ‘पोक्सो’च्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींना तात्काळ अटक केली असती तर दुसरा गुन्हा टळला असता. पोलिसांच्या विलंबामुळे संशयितांनी तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पीडितेच्या गावातील घरात घुसून दुसऱ्या दिवशी (ता. ६) तिच्यावर सत्तूर व कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतरही पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले. त्यानुसार बुधवारी (ता. ८) शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे व पोलिस हवालदार राजेंद्र मंगरूळे या दोघांसह बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका गुटकूल व पोलिस हवालदार भगवान माळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेने पोलिस दलात प्रचंड खळबळ माजली आहे.

चौघांची होणार विभागीय चौकशी

अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केल्यानंतर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी संशयित आरोपींना तत्काळ अटक का केली नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतरही पीडिता दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिला संरक्षण का मिळू शकले नाही, यासंदर्भात आता निलंबित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. तर दुसरीकडे तेथील पोलिस निरीक्षकांनीही या प्रकरणात हयगय केली आहे की नाही, याचीही चौकशी होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

बारावीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी खासगी शिकवणी संपवून रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरुन गावाकडे जात असताना दोघांनी रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ता. ५ रोजी कासारवाडी रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ घडली. घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संशयित आरोपींनी पीडितेला पोलिसांत तक्रार का दिली म्हणून घरात घुसून कोयता व सत्तूरने वार करुन तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करुन बार्शी न्यायालयात उभे केले असता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी सात दिवसांची (ता. १४ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली. अक्षय विनायक माने व नामदेव सिद्धेश्वर दळवी, अशी त्या दोन संशयितांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com