esakal | तब्बल 19 महिन्यांनंतर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सावंत ऍक्‍टिव्ह !
sakal

बोलून बातमी शोधा

Tanaji Sawant

तब्बल 19 महिन्यांनंतर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सावंत ऍक्‍टिव्ह !

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला (Shivsena) मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाला सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत (MLA Dr. Tanaji Sawant) जबाबदार असल्याच्या अनेक टीका झाल्या. तब्बल 19 महिन्यांपासून सोलापूरकडे दुर्लक्ष केलेले शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत हे आज (बुधवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेणार आहेत. (Nineteen months later, Shiv Sena MLA Dr. Tanaji Sawant became active)

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. तानाजी सावंत यांचा बुधवारी आणि गुरुवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच पक्षीय, शासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.

हेही वाचा: शहर-जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरूच ! मंगळवारी 60 बळी; 2703 जणांना डिस्चार्ज

बुधवारी (ता. 12) पंढरपुरातून या दौऱ्याला सुरवात होणार असून सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृहावर ते करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्‍यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता मोहोळच्या शासकीय विश्रामगृहावर मोहोळ आणि बार्शी तालुक्‍यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

त्यानंतर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. शिवसेना नगरसेवक, शहर पदाधिकारी तसेच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट युवासेना अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या सोबत दुपारी चार वाजता विश्रामगृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना परिस्थितीचे नियोजन व अडचणी यावर डॉ. सावंत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.