सकाळी ८ ते रात्री ९पर्यंत जड वाहनांना सोलापुरात नो एन्ट्री! कागदपत्रे पडताळूनच प्रवेश

जड वाहनांसबंधी सोलापूर पोलिस आयुक्तांनी सक्त आदेश दिले आहेत. त्यानुसार परवानगीधारक जड वाहनांना कागदपत्रे पाहून शहरात एन्ट्री दिली जाईल. इतर जड वाहनांसाठी सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत शहरात सोडले जाणार नाही.
cp rajendra mane
cp rajendra manesakal

सोलापूर : सर्वाधिक रस्ते अपघातात सोलापूर राज्यात ‘टॉपटेन’मध्येच आहे. शहरातील अपघात व मृत्यूला प्रामुख्याने जड वाहतूकच कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे आता जड वाहनांसबंधी सोलापूर पोलिस आयुक्तांनी सक्त आदेश दिले आहेत. त्यानुसार परवानगीधारक जड वाहनांना कागदपत्रे पाहून शहरात एन्ट्री दिली जाईल. इतर जड वाहनांसाठी सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत शहरात सोडले जाणार नाही.

शहरात महापालिका व स्मार्ट सिटीअंतर्गत वेगवेगळी कामे सतत सरू असल्याने डंपरची वाहतूक दिवसभर सुरू असते. त्यासाठी संबंधित यंत्रणेने पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी घेतली जाते. काही दिवसांपूर्वी सिव्हिल चौकात एका शिक्षिकेचा तर शनिवारी (ता. २९) एका चिमुकल्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. शिक्षिकेला धडक दिलेल्या डंपरचालकाकडे वाहतूक पोलिसांची परवानगी होती. तर चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डंपरचा परवाना संपला होता. तुळजापूर नाका येथील वाहतूक पोलिसांनी हात करूनही तो चालक तसाच पुढे आला होता. त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस कारवाई करीत आहेत. पण, यापुढे डंपर असो वा अन्य जड वाहनांमुळे अपघाती मृत्यू होणार नाही, यादृष्टीने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांच्या माध्यमातून वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना केल्या आहेत. परवानगी दिलेल्या वाहनांना अडवून त्यांच्याकडील फिटनेस प्रमाणपत्र, विमा, चालकाचा परवाना अशा कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस आयुक्तालयात आज बैठक

  • शहरात वाहनांची संख्या खूप झाली असून रस्ते अरुंद झाले आहेत.

  • अनेक रस्त्यांलगत वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण झाल्याची शहरात स्थिती

  • स्मार्ट सिटी व महापालिकेच्या विविध कामांसाठी अनेक जड वाहनांना परवानगी; त्याचा घेतला जाणार आढावा

  • खूपच अत्यावश्यक असलेल्या कामांसाठीच दिली जाणार जड वाहतुकीला परवानगी

अत्यावश्यक वाहनांना दुपारी परवानगी

परराज्यातून सोलापूर शहरात माल घेऊन आलेल्या वाहनांना त्यांची कागदपत्रे पाहून दुपारी एक ते चार यावेळेत शहरात येण्यास परवानगी दिली जाते. पण, त्या वाहनातील संपूर्ण माल याच ठिकाणी उतरणारा असावा, अशी अट आहे. त्याशिवाय इतर जड वाहनांना रात्री नऊनंतर व सकाळी आठपूर्वीच शहरात येण्यास व बाहेर जाण्यासाठी परवानगी असणार आहे.

जड वाहतुकीसंबंधी स्वतंत्र नियमावली

शहरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण वाढले असून वाहनांसाठी रस्ता अपुरा पडत असल्याची स्थिती आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. तसेच जड वाहनांच्या परवानगीसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार केली जाईल.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com