महाशिवरात्रीनिमित्त भविकांची दर्शनासाठी दाटी! मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddheshwar Yatra at Machanur

येथील मंदिरात मंगळवारी पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती.

महाशिवरात्रीनिमित्त भविकांची दर्शनासाठी दाटी! मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

ब्रह्मपुरी (सोलापूर) : 'हर हर महादेव' च्या गजरात माचणुर (ता.मंगळवेढा) येथील सिद्धेश्वर यात्रा उत्सावात सुरु झाली. येथील मंदिरात मंगळवारी पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे यात्रा उत्सव यावर प्रशासनाने बंदी केली होती. परंतु यावर्षी सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने भाविकांना दर्शन घेता येणार असून कोरोनाचा फैलाव होईल, अशा घटनाची योग्य ते खबरदारी घ्यावी अशा सूचनांचे निर्बंध घातले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पाच वाजता तहसीलदार स्वप्निल रावडे, मंडलाधिकारी धनंजय इंगोले, तलाठी समाधान वगरे, ग्रामसेवक गोरख जगताप व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत 'श्रीं 'ची महापूजा करण्यात आली.

हेही वाचा: सोलापूर : राज्यात ५० हजार जागांची मेगाभरती

यावेळी यात्रा समितीच्यावतीने दामाजी शुगरचे संचालक राजीव बाबर, सुखदेव कलुबरमे, प्रकाश डोके, उपसरपंच उमेश डोके, धनाजी डोके, समाधान डोके, आदींनी तहसीलदार स्वप्निल रावडे यांचा 'श्री' ची मूर्ती श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महाशिवरात्री निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे पहाटे पासून दर्शनास लांबलचक रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात गायक मस्तान मुल्ला यांच्या भजन, कीर्तन व गौळन संगीतमय कार्यक्रमामुळे भक्तिमय आवाजाने वातावरण फुलुन गेले असून भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात महिलांसाठी व पुरुषासाठी स्वतंत्र दर्शनरांगा केल्या होत्या. त्यामुळे दर्शन करणे सुलभ झाले असून भाविकांनी समाधान व्यक्त केले. भिमा नदी पात्रात पाणी असल्यामुळे भाविकांची स्नानांची सोय झाली होती.

सोलापूरपासून 40 किमी व मंगळवेढ्यापासून 14 किमी अंतरावर भीमा नदीच्या काठावर कडेकपारीत सुंदर असे निसर्गरम्य प्राचीन हेमाडपंथी श्री सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराकडे डाव्या बाजूस भव्य असे मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे. मंदिरामधे प्रवेश करताच समोरील भागात नंदी, उजव्या बाजूस गणेश मूर्ती व गाभाऱ्यामध्ये पिंड व सिद्धेश्वराची मूर्ती आहे. मंदिरातून बाहेर येताच भीमा नदीच्या पात्रात सुंदर देखणे जटाशंकर मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी नदिकडे भव्य असा घाट बांधला आहे. प्राचीन काळी येथे औरंगजेब वास्तव्यास असल्याने मंदिराच्या पूर्व बाजूस भुयकोट किल्ला आहे. निसर्गरम्य असे देवस्थान असल्यामुळे येथे लाखों भाविक दर्शनासाठी सातत्याने येतात. भीमा नदीच्या पात्रात पाणी असल्यामुळे भाविकांनी पहाटे अंघोळ करून ओल्या पडद्याने दर्शन घेतले. दिवसभर मंदिर व परिसर भाविकांनी फुलून गेले होते.

हेही वाचा: सोलापूर : प्रवाशांनी पुन्हा गजबतेय एसटी बसस्थानक

मंगळवेढा आगार व सोलापूर येथून भाविकांच्या सोयीसाठी एसटी, खाजगी बसेसची सोय करण्यात आली होती. मंदिरामध्ये भावगीत, भक्तीगीत असे समुहगीत कार्यक्रम ठेवल्याने परिसर भक्तीमय बनला होता. यामध्ये भजन सम्राट मस्तान मुल्ला, अरुण शिवशरण, विनावादक बबन सरवळे, विठ्ठल पाटील, दत्तात्रय डोंगरे, परवेज मुलाणी आदींचा यामध्ये समावेश होता. मंदिरामध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे हा परिसर भक्तिमय वातावरणात फुलून गेला होता. भाविकांना दर्शनाचा लाभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत यात्रा समितीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यात्रा समिती, श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशन व महिला हॉस्पिटल, मंगळवेढा यांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावर्षी यात्रेत दुकानांची संख्या जास्त असली तरी गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे यात्रा उत्सव कार्यक्रम बंदीमुळे आर्थिक फटका व्यापार वर्गाना बसला होता. यात्रा समितीने योग्य नियोजन केल्याचे व कमी प्रमाणात जागा भाडे आकारले असल्यामुळे यावर्षी गर्दी मोठ्या प्रमाणात होऊन विक्री चांगल्या प्रकारे होईल असे दुकानदारांनी सांगितले.

यात्रेमध्ये पार्किंगसाठी दुचाकी व चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी यात्रा काळात चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवेढा भाविकांना येण्याजाण्यासाठी परिवहन मंडळाच्या मंगळवेढा व सोलापूर आगाराने बसगाड्यांची सोय केली होती. मंदिर परिसरात लाखों भाविकांचे 'श्री' चे दर्शन सुलभ होण्यासाठी महिला व पुरुषांना स्वतंत्र दर्शन रांगा असून एक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, पोलिस उपनिरीक्षक, स्ट्राइकिंग, होमगार्ड ,पुरुष व महिला पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Web Title: On The Occasion Of Mahashivratri The Siddheshwar Yatra At Machanur Began At Utsawa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..