esakal | पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू ! आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली उभारतंय शंभर बेडचे हॉस्पिटल
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Hospital

पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू ! आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली उभारतंय शंभर बेडचे हॉस्पिटल

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पोलिस वेल्फेअर फंडातून पोलिस मुख्यालयातील पोलिस पब्लिक स्कूलच्या इमारतीत 100 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभारले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर पहारा देणाऱ्या पोलिसांना कोरोना काळात तत्काळ उपचार व्हावेत, या हेतूने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत शहर पोलिस दलातील 145 हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यातील एक अधिकारी व चार कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले. सद्य:स्थितीत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आगामी काळात कोरोना बाधित पोलिसांची सोय व्हावी, त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये 70 ऑक्‍सिजन बेड तर 30 सेमी व्हेंटिलेटर बेडही असणार आहेत. एमडी-मेडिसीन डॉक्‍टरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. पोलिस वेल्फेअर फंडातून त्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार असून पोलिस असो वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर मोफत उपचार केले जातील. रेमडेसिव्हीरसह सर्वच औषधांचा मुबलक साठा त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्‍यात घालणाऱ्या पोलिसांसाठी जिल्हा प्रशासनाकडूनही मदत घेतली जाणार आहे.

हेही वाचा: नऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून ! शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्‌...

...त्या कर्मचाऱ्यांचे जाणे लागले जिव्हारी

शहर पोलिस दलातील एक सहाय्यक पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची पत्नी, सून व मुलाने पोलिस आयुक्‍तांची भेट घेऊन ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांना बेड उपलब्ध झाले, परंतु कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ड्यूटीवर असलेल्या एका अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आगामी काळात पोलिसांवर तशी वेळ येऊ नये म्हणून पोलिस आयुक्‍तांनी स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचे पाऊल उचलले. त्यासाठी पोलिस उपायुक्‍त बापू बांगर, डॉ. दीपाली धाटे, डॉ. वैशाली कडूकर यांनीही परिश्रम घेतले.

हेही वाचा: बाईकवर डबलसीट फिरताय तर सावधान ! लायसनसह होणार वाहन जप्त

पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी उचलले पाऊल

पोलिस अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटाशी दोन हात करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस शहरभर पहारा देत आहेत. त्या पोलिसांची व त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षितता म्हणून 100 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभारले जात आहे; जेणेकरून त्यांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागणार नाही.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

loading image
go to top