सततच्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील फळबागांचा बहार वाया जाण्याची भिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

गेल्या महिनाभरा पासून बुडातील ओलच हटल्याने द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, पेरू आदीसह अन्य फळबागांचा धरलेला बहार वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

पावसामुळे मोहोळ तालुक्यातील फळबागांचा बहार वाया जाण्याची भिती

मोहोळ (सोलापूर): उत्तरा नक्षत्राच्या पावसाने तसेच त्या अगोदर पडलेल्या पावसाने मोहोळ तालुक्यात चांगली हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गेल्या महिनाभरा पासून बुडातील ओलच हटल्याने द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, पेरू आदीसह अन्य फळबागांचा धरलेला बहार वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. दरम्यान शासकीय आकडेवारी नुसार मोहोळ तालुक्यात आज पर्यंत 439 मिलिमीटर पाऊस पडला आहे सर्वात जास्त पाऊस मोहोळ मंडळात 882 मिलिमीटर, तर सर्वात कमी पाऊस टाकळी सिकंदर मंडळात 259 मिलिमीटर इतका पडला आहे.

हेही वाचा: मोहोळ: लोकअदालतमध्ये अडीच कोटीची विक्रमी तडजोड

आषाढ सुरू झाल्यापासून मोहोळ तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी फुटले आहे. वरचेवर पडणाऱ्या पावसाने भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आता इथून पुढे पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाणार आहे. पाणी जादा झाल्याने शेततळी विहिरी भरल्या आहेत. गेल्या सहा महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी विविध फळबागांना रासायनिक खते, गाव खते घालून, फवारणी करून बहार धरला आहे, मात्र सततच्या पावसामुळे फळबागेच्या बुडातील ओल न हटल्याने बहार वाया जातो काय अशी धास्ती बसली आहे, तर त्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाणार आहे.

हेही वाचा: ‘ॲमिनिटी’चा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन - महापौर मुरलीधर मोहोळ

कांदा, केळी या पिकांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. कांद्याची वाढ खुंटली आहे तर केळी व ऊसाला पाणी लागले आहे. ऊसाच्या बुडातील कोंब नासु लागले आहेत. जमीन वाफशावर आली असता नुसते ढगाळ वातावरण झाले तरीही जमिनीला पाणी सुटू लागले आहे. जमिनी शेवाळल्या आहेत. सध्या द्राक्ष, डाळिंब, पेरू बागातून पाणी वाहत आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. जमिनीत वाफसा येत नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. रिमझिम पावसाने झेंडू व शेवंती फुलातील पाणी न हटल्याने त्यांचेही दर खाली आले आहेत. डाळिंब वगळता सध्या कुठल्याही शेतमालाला दर नाहीत, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

loading image
go to top