
राष्ट्रवादीसह विरोधकांचा चक्रव्यूह! कॉंग्रेसमधील पक्षांतरामुळे आमदार प्रणिती शिंदे एकाकी
सोलापूर : शहराभोवतीच्या चार विधानसभा मतदारसंघापैकी शहर मध्य हा मतदारसंघ वगळता दक्षिण सोलापूर, शहर उत्तर आणि अक्कलकोट या तिन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी लाटेतही आपला गड राखला. त्यांना थेट विरोध करुनही काहीच हाती लागणार नसल्याची खात्री झाल्याने आता त्यांच्या विजयातील महत्त्वाच्या शिलेदारांना फोडून आपल्या पक्षात घेण्याचा डाव राष्ट्रवादीतील तथा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावरील काही नेत्यांनी आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधकांसोबतच स्वकीयांच्या चक्रव्युहातून आमदार प्रणिती शिंदे या यशस्वीपणे कशा बाहेर पडतील, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
हेही वाचा: नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर! प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद?
महापालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कधीच महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर झाला नाही. सातत्याने त्यांच्या वाट्याला उपमहापौरपदच आहे. सर्वाधिक जागा (नगरसेवक) कॉंग्रेसने जिंकल्याने त्यांनीही महापौरपद कधी राष्ट्रवादीसाठी सोडले नाही. 2017 च्या निवडणुकीत भाजपने महापालिकेवर दुसऱ्यांदा सत्ता मिळविली. शहर-जिल्ह्यातील कॉंग्रेसला मोदी लाटेत अपेक्षित यश मिळाले नाही. शहरात कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असतानाही तिसऱ्या क्रमांकावर पोहचला. राष्ट्रवादीलाही मोठा फटका बसला आणि केवळ चार नगरसेवक विजयी झाले. राज्यात शिवेसना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचा भाव पुन्हा वधारला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरवात केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही ग्रामीणच्या तुलनेत शहरातच अधिक फोकस केला. आतापर्यंत कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खटमल हे राष्ट्रवादीत आले. तर माजी महापौर ऍड. यु. एन. बेरिया, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, प्रिया माने यांच्यासह इतरांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. तरीही, कॉंग्रेसमधील आणखी खूपजण राष्ट्रवादीत दिसतील, असा दावा महेश कोठेंनी केला. त्यामुळे स्वकीयांच्याच चक्रव्युहाला भेदून कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या महापालिकेवर आपलाच महापौर बसवतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सोलापूर : महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार
सर्वकाही महापौरपदासाठीच...
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीला पक्षाचा महापौर बसविता आलेला नाही. जेव्हा जेव्हा कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आली, त्यावेळी महापौर कॉंग्रेसचाच झाला. त्यामुळे महापौरपदाचे ते अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉंग्रेसमधील नाराजांवरच राष्ट्रवादीने अधिक फोकस केला आहे. तसेच शिवसेना, एमआयएम, वंचित बहूजन आघाडीसह भाजपमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांवरही विशेष लक्ष जात आहे. त्यासाठी एमआएमचे तौफिक शेख, वंचित बहूजन आघाडीचे आनंद चंदनशिवे, कॉंग्रेस सोडणारे ऍड. यु. एन. बेरिया यांच्या माध्यमातून महेश कोठे यांचा तो डाव असल्याची चर्चा आहे.
Web Title: Oppositions Maze With Ncpmla Praniti Shinde Lonely Due To Defection In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..